सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, व्होल्व्हो गाडीप्रमाणेच एशियाडचा (निमआराम) प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी महामंडळाने पुशबॅक आसनांची प्रणाली बसविण्याचे निश्चित केले आहे.खासगी प्रवासी वाहतुकीशी सामना करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने व्होल्व्हो ‘शिवनेरी’, ‘शीतल’ अशा वातानुकूलित व आरामदायी बसेस सुरू केल्या आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये या दोन्ही बसेसची सेवा धुमधडाक्यात सुरू आहे. आरामदायी व सुखकर प्रवासाचा आनंद एशियाड (निमआराम) बसगाड्यांमधील प्रवाशांना मिळावा, यासाठी सर्व बसेसमधील आसनांना पुशबॅक सुविधा देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी एशियाडमधील चार सीट कमी होऊन त्या ३५ वर येतील. खासगी बसगाड्यांप्रमाणे आसन मागे-पुढे करता येईल. यावर प्रवाशांना आराम मिळू शकेल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशांना व्होल्व्होसारखी सेवा एशियाडमध्ये मिळणार असल्याने एसटीकडे प्रवासी वाढतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.दरम्यान, राज्यात वातानुकूलित बससाठी वाढती मागणी लक्षात घेऊन महामंडळाने सुमारे ३० ते ३५ गाड्या भाडे तत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढल्याचे सूत्रांनी नमूद केले. (प्रतिनिधी)खासगी वाहतुकीशी स्पर्धाएस.टी. ची नेहमी खासगी वाहतुकीशी स्पर्धा होत आली आहे. खासगी बसेस विविध आमिषे दाखवून प्रवाशांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे एस.टी महामंडळही बदल स्विकारत आहे.
एसटीतही आता वातानुकूलितचा प्रवास
By admin | Updated: November 7, 2014 23:39 IST