मुंबई : शिवसेना-भाजपा ‘महायुती’मधून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम हे घटकपक्ष बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली असून, तसे झाले तर शिवसेना, भाजपा व रिपाइं यांची ‘नॅनो युती’ होऊ शकते. जागावाटपाचे अडलेले घोडे पुढे सरकावे याकरिता मंगळवारी रात्री वांद्रे-कुर्ला संकुलातील हॉटेलात रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यात समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा राजू शेट्टी, महादेव जानकर व विनायक मेटे यांची आमदार निवासात बैठक झाली. त्या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हजर होते. त्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक ओम माथूर यांचे वास्तव्य असलेल्या पेडर रोड येथील निवासस्थानी झाली. शिवसेना नेत्यांच्याही सकाळपासून मातोश्रीवर बैठका सुरू होत्या. बुधवारी दुपारी शेट्टी, जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षांनी आपला विश्वासघात केला. आम्ही महायुतीमधून बाहेर पडत असल्याचे या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकसुरात सांगितले. सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यास पत्रकार परिषद घेण्याची घोषणाही केली. मात्र पुन्हा सेनानेते महायुती सावरण्यास सरसावले. शेट्टी, जानकर व मेटे यांना पुन्हा वांद्रे-कुर्ला संकुलातील पंचतारांकित हॉटेलातील पाहुणचार घेण्यास निमंत्रित केले गेले. तेथे सेनेचे दिवाकर रावते, संजय राऊत, अनिल देसाई आदी नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर भाजपाचे नेते तेथे पोहोचले व त्यांच्यासोबत वाटाघाटी सुरू झाल्या. त्यानंतर पुन्हा हे नेते मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेले. मात्र उशिरापर्यंत समाधानकारक तोडगा निघाला नाही.
आता महायुतीत मित्रपक्षच वक्री!
By admin | Updated: September 25, 2014 05:22 IST