यदु जोशी, मुंबईलोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील ७४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी सीआयडीमार्फत सुरू असून, महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम सध्या अटकेत आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. या महामंडळात बेकायदा नोकर भरती करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत मोरे यांनी ७४ जणांना कारणे दाखरा नोटिसा बजावल्या आहेत. एक महिन्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे. विहित प्रक्रियेचा अवलंब न करता मागच्या दाराने केलेली नोकर भरती ही अवैध ठरते आणि अशा भरतीने आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले पाहिजे, असा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखलाही नोटिशीमध्ये देण्यात आला आहे. महामंडळात भरती करण्यात आलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना एक महिना आधी नियुक्ती दाखवून प्रत्येकी २० लाख रुपयांचे गृहकर्ज देण्यात आले. ही रक्कम नोकरी देण्यासाठीची लाच म्हणून कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली, असा आरोप आहे. गृहकर्जाची रक्कम वसूल करण्यासाठीची कार्यवाहीदेखील महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन महामंडळाने गेल्या महिन्यापासून बंद केले आहे. साठे महामंडळाच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम सध्या अटकेत आहे. अर्ज मागविण्यासाठी जाहिरात देणे, परीक्षा, मुलाखती घेणे अशी कोणतीही प्रक्रिया न अवलंबिता त्याच्या कार्यकाळात नोकरभरती करण्यात आली होती. ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांमुळे गाजत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कामकाज चौकशीच्या नावाखाली ठप्प करण्यात आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १३ ) दुपारी मुंबईच्या आझाद मैदानावर लाल सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. जुन्या मंजूर कर्जप्रस्तावांना निधी दिला जात नाही आणि नवीन प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत, असा आरोप लाल सेनेचे नेते कॉ. गणपत भिसे यांनी केला आहे.
७४ कर्मचाऱ्यांना नोटिसा
By admin | Updated: October 13, 2015 04:07 IST