मुंबई- रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत बांधकाम करून सीआरझेडचे उल्लंघन केलेल्या १७० बंगल्यांना नोटीस देण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी दिले. विधिमंडळाच्या अधिवेशनात तशी घोषणा करूनही अजून नोटीस न दिल्याबद्दल कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.राज्य मंत्रिमंडळाच्या परवा झालेल्या बैठकीत नोकरशाही मंत्र्यांनी सभागृहात केलेल्या घोषणांची गांभीर्याने अंमलबजावणी करीत नाही व त्यामुळे मंत्र्यांना टीकेचे धनी व्हावे लागते हा मुद्दा उपस्थित झाला होता. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्या लगतच्या अनेक धनाढ्य लोकांच्या बंगल्यांनी सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यावर तात्काळ नोटीसा देऊन कारवाई करण्याची घोषणा कदम यांनी केली होती. कदम यांनी रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांना बोलावून घेतले व अद्याप नोटीस का दिल्या नाहीत, अशी विचारणा केली. (विशेष प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यातील १७० बंगल्यांना नोटीस
By admin | Updated: May 15, 2015 04:48 IST