- अतुल कुलकर्णी, मुंबईमाजी आमदार आणि राज्य सरकारमधील विद्यमान मंत्र्यांना आमदार निवासाचा मोह सुटेनासा झाला आहे. तब्बल २० मंत्र्यांनी ३५ खोल्या अडवून ठेवल्या आहेत, तर नऊ माजी आमदारांनी खोल्या अडवल्या आहेत. ही माहिती विधान भवन अधिकाऱ्यांनी पत्राच्या उत्तरादाखल दिलेली आहे.सहा मंत्र्यांकडे प्रत्येकी एक, १२ जणांकडे प्रत्येकी २, तर २ मंत्र्यांकडे प्रत्येकी ३ खोल्या आहेत. मंत्रीच ऐकत नाहीत मग आमदार तरी कसे मागे राहणार? मॅजेस्टिक आमदार निवास धोकादायक अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी आमदारांना खोल्या सोडण्याचे आदेश देऊनही तिथल्या खोल्या रिकाम्या होत नसल्याची माहिती आहे. मनोरा, आकाशवाणी, मॅजेस्टिक या तीनपैकी मॅजेस्टिक बंद करण्यात येणार असल्याने सध्या प्रत्येक आमदारास एकच खोली देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र त्या निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. मंत्र्यांना बंगले मिळाले असले तरी आमदार निवास हे सोयीचे ठिकाण असल्याने त्यांना ते सोडवत नाही. परिणामी, नव्या आमदारांसाठी खोल्याच शिल्लक नाहीत. नोटिसा पाठवून झाल्या. आता दररोज २ हजार रुपये भाडेही दंडात्मक कारवाई म्हणून लावून झाले, तरीही सरकारच्या या मात्रेला कोणी दाद देईनासे झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, की माझ्या माहितीप्रमाणे मी रूम सोडल्या आहेत, तरीपण खात्री करून घेतो. आतापर्यंत ७० ते ८० आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. जे खोल्या सोडत नाहीत त्यांना दररोज २ हजार रुपयांप्रमाणे भाडे लावणे सुरू केले आहे. महिन्याचे भाडे ६० हजार रुपये होते. आमदारांच्या मानधनातून ते कमी केले जाईल, असे विधानसभा प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.कोणत्या मंत्र्यांकडे आहेत खोल्या ?देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री), दिवाकर रावते, सुधीर मुनगंटीवार, रामदास कदम, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश बापट, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर, चंद्रशेखर बावनकुळे, राजकुमार बडोले, विजय देशमुख, दादाजी भुसे, संजय राठोड, दीपक केसरकर, डॉ. रणजित पाटील, विजय शिवतारे, राम शिंदे, प्रवीण पोटे पाटील सगळ्यांनाच खोल्या तातडीने रिकाम्या करा, असे आदेश देण्यात आले आहेत. नोटिसा पाठवण्याच्याही सूचना केल्या आहेत. दररोज दंड लावा, असे सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात आणखी किती जणांकडे खोल्या आहेत याचा आढावा घेतला जाईल. - हरीभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभासगळे ज्येष्ठ-श्रेष्ठ आहेत. फार कोणाला सांगायची वेळ येऊ नये, असे आपल्याला वाटते. मंत्र्यांना शासकीय निवासस्थाने मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी बाकीच्यांचा विचार करावा. यापेक्षा जास्त मी काय बोलणार? - रामराजे निंबाळकर, सभापती, विधान परिषद
मंत्र्यांनाच सुटेना आमदार निवासाचा मोह !
By admin | Updated: August 13, 2015 03:15 IST