अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत केवळ ६५ टक्केच अर्ज दाखलनागपूर : अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर. आतापर्यंत नागपूर विभागात एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ ६५ टक्के अर्जांची छाननी झाली आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे यंदादेखील मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहणार व अर्ज दाखल केलेल्या प्रत्येकाला सहजपणे प्रवेश मिळणार, असेच चित्र दिसून येत आहे. परंतु कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांच्या चिंतेत निश्चितपणे वाढ झाली आहे.२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणावर एआरसी केंद्रे असूनदेखील विद्यार्थ्यांची म्हणावी तशी गर्दी झालीच नव्हती. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बुधवार २ जुलैपर्यंत १५,८१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर विभागात उपलब्ध असलेल्या २४,३९२ हजार जागांच्या तुलनेत याची टक्केवारी काढली तर ती अवघी ६४.८५ टक्के भरते. ३ जुलै रोजी ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करून कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे सत्यापन करण्याची अखेरची तारीख आहे.व्यवस्थापन कोट्यावर भिस्तमागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. नागपूर विभागात अभियांत्रिकीची ५७ महाविद्यालये आहेत.यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून जागा भरण्यावरच भर ठेवला होता.(प्रतिनिधी)अर्ज दाखल करण्याची मुदत वाढणार?मागील दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील इतक्या कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. बारावीच्या निकालात सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, अशी शक्यता होती. परंतु हे अंदाज चुकल्याचेच अर्जांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाकडे बुधवारपर्यंत तरी कुठलीही सूचना आली नव्हती.
यंदाही ‘अच्छे दिन’ नाहीच
By admin | Updated: July 3, 2014 01:02 IST