परीक्षा नियंत्रकपद: सर्वच उमेदवार ‘फेल’नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला पूर्णवेळ परीक्षा नियंत्रकासाठी आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या परीक्षा नियंत्रकपदाच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखतींमध्ये सर्वच उमेदवारांवर फुली मारण्यात आली. मुलाखतीला आलेल्या उमेदवारांपैकी एकही जण या पदासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा निवड समितीने दिला. दरम्यान, या मुलाखतींमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता असल्यामुळेच सर्वांना ‘नॉट फाऊंड सुटेबल’ असा शेरा देण्यात आला असल्याची चर्चा विद्यापीठात होती. विलास रामटेके यांच्या राजीनाम्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांना परीक्षा नियंत्रकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यासोबतच नागपूर विद्यापीठाने पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी जाहिरात काढली. विद्यापीठाला प्राप्त झालेल्या १९ पैकी ९ जणांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. बुधवारी १० जणांच्या मुलाखती होणार होत्या.दुपारच्या सुमारास निवड समितीचे सदस्य विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत एकत्र आले. सुरुवातीला परीक्षा नियंत्रकांची निवड वैध राहील का, यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात आला. त्यानंतरच मुलाखतींना सुरुवात झाली. मुलाखतींना १० पैकी ७ उमेदवारच होते. या मुलाखतींमध्ये उमेदवारांचे सादरीकरण पाहण्यात आले. सुमारे ६.३० वाजेपर्यंत सर्व मुलाखती चालल्या. निवड समितीने एकमताने एकही उमेदवार या पदासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा दिला. पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक पदासाठी लवकरच परत जाहिरात काढण्यात येईल व संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी दिली.(प्रतिनिधी)विद्यापीठाचा ‘सेफ गेम’?परीक्षा नियंत्रकपदाच्या निवड प्रक्रियेसाठी किमान ३० दिवसांचा कालावधी देणे गरजेचे आहे. मात्र २७ आॅगस्टला निघालेल्या परिपत्रकाला बुधवारपर्यंत ३० दिवस पूर्णच होत नव्हते. या मुद्यावरुन पुढे कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळेच कोणत्याही उमेदवाराची निवड करण्यात आली नाही की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकही लायक नाही !
By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST