पुणे : गर्भलिंग चाचणी व निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत सोनाग्राफी केंद्रांची कडक तपासणी व कारवाई होत आहे. मात्र गेल्या ४ वर्षांत बेकायदेशीर गर्भपात केंद्रांविरुद्ध एकही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही, त्याचबरोबर एकही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. शहरात मान्यताप्राप्त ३२४ गर्भपात केंद्रांमधून दिवसाला सरासरी ४३ गर्भपात होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील मुलींचा जन्मदर २००९ मध्ये दर हजारी मुलांमागे ८८६ इतका घसरलेला होता. त्यानंतर महापालिकेत पीसीपीएनडीटी सेल सुरू झाल्यानंतर आता हा जन्मदर ९३३ पर्यंत वाढला आहे. पीसीपीएनडीटी सेलअंतर्गत शहरातील सर्व सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये बेकायदेशीर गर्भपात केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्री-भ्रूणहत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे आता सोनोग्राफी केंद्रांबरोबर गर्भपात केंद्रांच्या तपासणीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे महापालिकेमध्ये गर्भपात सेंटरची तपासणी ही पीसीपीएनडीटी सेलच्या अंतर्गत न ठेवता ती स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त गर्भपात केंद्राची कडक तपासणी करण्याबरोबर बेकायदेशीर गर्भपात केंद्र शोधून काढण्याची मागणी लेक लाडकी या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रभारी उपआरोग्यप्रमुख अंजली साबणे यांनी सांगितले, ‘‘शहरातील मान्यताप्राप्त ३२४ गर्भपात केंद्रांची दर ३ महिन्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. गेल्या ४ वर्षांत बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाबद्दल तसेच गर्भपात केंद्रातील चुकीच्या गोष्टींबाबत एकही तक्रार पुणे महापालिकेकडे आलेली नाही. त्याचबरोबर एकाही गर्भपात केंद्राविरुद्ध आतापर्यंत कारवाई झालेली नाही.’’(प्रतिनिधी)
गर्भपात केंद्राविरुद्ध ४ वर्षांत नाही एकही तक्रार
By admin | Updated: March 14, 2017 07:53 IST