चेतन ननावरे, मुंबईदुधाच्या पिशवीवर अतिरिक्त पैसे आकारणाऱ्या विक्रेत्यांना शनिवारी वैध मापन शास्त्र विभागाने दणका दिला आहे. एमआरपी (मॅक्सिमम रिटेल प्राइस) अर्थात कमाल किरकोळ किंमतीहून दूध, आईस्क्रीम आणि पाणी थंड करण्यासाठीजादा पैसे मागणाऱ्या दुकानदारांसह संबंधित कंपन्यांविरोधातही प्रशासनाने तब्बल १७५ खटले भरले आहेत. लवकरच संपूर्ण राज्यात कारवाई अधिक तीव्र करणार असून अधिकाधिक ग्राहकांनी प्रशासनाकडे थेट तक्रार करण्याचे आवाहन विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांनी केले आहे.मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरांत आणि ठाणे, नवी मुंबई परिसरात प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दूधाची पिशवीसोबतच आता दुग्धजन्य पदार्थ, कोल्ड्रींग आणि मिनरल वॉटर थंड करण्यासाठी किंवा पाण्याची बाटली ‘चिल्ड’ ठेवण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट करणाऱ्या दुकानांवरही कारवाई होणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. पाण्डेय म्हणाले की, बहुतेक दुकानदार ग्राहकांची लूट करत असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. प्रशासनाने ठरवून दिलेल्या एमआरपीहून अधिक रक्कम आकारणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही मुंबईसह राज्यभर दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि शीतपेयांची विक्री ही एमआरपीहून चढ्या भावाने होत आहे. एखाद्या विक्रेत्याकडे विक्रीसाठी दिलेला माल ग्राहकांपर्यंत योग्य किंमतीत पोहचतोय का? हे तपासण्याचे काम संबंधित कंपनीचे आहे. त्या पदार्थासाठीही ती कंपनीच जबाबदार असते. त्यामुळे अधिक पैसे आकारणाऱ्या दुकानदारांसोबत संबंधित प्रोडक्टच्या कंपनीविरोधातही खटले दाखल करण्यात आले आहे. खटले दाखल केलेल्या कंपन्यांत अमूल, आरे, महानंद, गोवर्धन अशा बहुतेक नामांकित कंपन्यांची नावे आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात धडक कारवाई केल्यानंतर प्रशासनाने सर्वसामान्य ग्राहकांसाठी व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार केले आहेत. त्यात ग्राहकांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या प्रतिनिधींना अॅड करून विभागातील अतिरिक्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
‘चिल्ड’साठी जादा पैसे नको! राज्यभर होणार कारवाई
By admin | Updated: April 6, 2015 04:17 IST