नेर (जि़ यवतमाळ) : गैरव्यवहार दडपण्यासाठी वसुली एजंटनेच पेट्रोल टाकून पतसंस्था जाळल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री नेरमध्ये घडली. यामध्ये पतसंस्थेतील साहित्य जळून खाक झाले, एजंटही ३२ टक्के भाजला असून, त्याला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या प्रकरणात शिपाई विलास पोहणकर याला पोलिसांनी अटक केली आहे़ महिला अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटी मर्यादित नेरमध्ये ही घटना घडली. पतसंस्थेच्या अध्यक्ष मीना देशमुख यांचे पती विलास देशमुख यांच्या तक्रारीवरून नेर पोलीस ठाण्यात उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आगीमध्ये पतसंस्थेचे फर्निचर आणि दस्तऐवज जळून खाक झाले. त्यात ३ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या वेळी तिजोरीतील ५२ हजारांची रोकड, ११६ कोरे चेक व दोन बाँड सुरक्षित राहिले. आगीच्या या घटनेत पतसंस्थेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण आणि शिपाई विलास पोहणकर यांचा सहभाग असल्याचे रवींद्र भोयर याने जबाबात म्हटले आहे़ तसेच पोलिसांनी मोबाइल कॉल डिटेल्स तपासले असता शिपाई पोहणकर व एजंट भोयर यांचे रात्री १२ ते मध्यरात्रीनंतर १ दरम्यान अनेकदा संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले. व्यवस्थापक चव्हाण यांनी भोयरला बुधवारी सायंकाळी त्याच्याकडील वसुलीचे पावती बुक तपासण्यासाठी आणण्यास सांगितले होते. (प्रतिनिधी)
नेरमध्ये एजंटानेच जाळली पतसंस्था!
By admin | Updated: November 7, 2014 04:05 IST