डॉ. किरण वाघमारे ल्ल अकोला विधानसभेच्या रणसंग्रामात अनेक दिग्गज उतरले आहेत. यामध्ये ज्यांनी खासदारकी भोगली, असेही काही उमेदवार आहेत. राज्यातील ९ माजी खासदार आमदार होण्याच्या तयारीने मैदानात उतरले असून, हे माजी खासदार विजयी झाले तर त्यांना लोकसभेसोबतच विधानसभेतही काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. लोकसभा हे देशाचे सर्वोच्च सभागृह आहे. लोकसभेत संपूर्ण देशाचे प्रतिबिंब अनुभवण्यास मिळते. त्यामुळे या सभागृहात जाण्यासाठी मोठी चढाओढ असते; मात्र दिल्लीचे अनुभव घेऊन, पुन्हा महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही कमी नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ९ माजी खासदार आपले भाग्य आजमावत आहेत. त्यापैकी काहींना अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपयश आले होते. जे माजी खासदार विधानसभा निवडणूक लढवित आहेत, त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४ उमेदवार काँग्रेसचे आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीचे ३, तर भाजपचे २ आहेत.यात वर्धा जिल्ह्यातील देवळी येथून सुरेश वाघमारे (भाजप), जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून हरिभाऊ जावळे (भाजप), नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून सुबोध मोहिते (काँग्रेस), धुळे जिल्ह्यातील नवापूर येथून स्वरूपसिंग नाईक (काँग्रेस), परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून सुरेश वरपुडकर (काँग्रेस), हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथून अॅड. शिवाजी माने (राष्ट्रवादी काँग्रेस), सांगली येथून मदन पाटील (काँग्रेस), बारामती येथून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी) तर नाशिक पूर्वमधून देवीदास पिंगळे (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.
नऊ माजी खासदार विधानसभेच्या रिंगणात
By admin | Updated: October 9, 2014 04:30 IST