मुंबई : मालेगाव २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करून चार वर्षे उलटले तरीही अद्याप या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जानेवारी अखेरपर्यंत या बॉम्बस्फोटातील आरोपींवर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता विशेष सरकारी वकिलांनी वर्तवली आहे. ‘जानेवारी अखेरपर्यंत एनआयएचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. अंतिम अहवाल एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. दिल्ली मुख्यालयाने परवानगी दिल्यानंतर हा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात येईल,’ अशी विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी दिली. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामध्ये जहाल उजव्या हिंदू संघटनेचा हात असल्याचा दावा एनआयएचा आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, रमेश उपाध्याय व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. या सर्वांवर महाराष्ट्र राज्य दशहतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर २०११ मध्ये एनआयएकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यास अतिविलंब झाल्याने आरोपींनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच काही आरोपींनी मोक्का लागू केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या केसमधील साक्षीदार एकाच ठिकाणी स्थिर नसल्यानेही या केसमध्ये आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे अॅड. रसाळ यांनी सांगितले. जून २०१५ मध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी एनआयएने त्यांना ही केस फारशी गांभीर्याने न घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दिली होती. एनआयएकडे ही केस वर्ग केल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत एकही कागदपत्र सादर न केल्याचा आरोपही सॅलियन यांनी केला. प्रसाद पुरोहित, राकेश धावडे, दयानंद पांण्डे आणि रमेश उपाध्याय यांची अखंड हिंदू राष्ट्र विचारधारा तसेच अल्पसंख्यांकांविरुद्ध असलेल्या द्वेषाबाबत विशेष मोक्का न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. तसेच साध्वीची यात महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हणत विशेष न्यायालयाने तिलाही जामिन देण्यास नकार दिला.
एनआयए आरोपपत्र दाखल करणार!
By admin | Updated: December 31, 2015 01:16 IST