- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील आराेग्य विभागाच्या राष्ट्रीय आराेग्य अभियान (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी तब्बल २३ दिवसांपासून सुरू असलेला त्यांचा बेमुदत संप अखेर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. संघटनेच्या १३ पैकी १० मागण्यांना तत्वतः मान्यता दिली असून लेखी पत्र दिले, असे राष्र्टीय आराेग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघचे राज्य समन्वयक मनिष खैरनार यांनी सांगितले.
जिल्ह्यासह राज्यभरातील ३५ हजार अधिकारी व कर्मचारी या कामबंद आंदाेलनात सहभागी झाले हाेते. १९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या या कामबंद आंदोलनात प्रथमच १८ संघटनांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी झाल्या होत्या. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेऊन १० मागण्या तत्त्वत: मान्य केल्या. त्यामुळे एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश मिळाले असून आराेग्याच्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाेत्सव व्यक्त केला जात आहे, असे खैरनार यांनी स्पष्ट केले.
१० मागण्यांना तत्वतः मान्यता -
यामध्ये दरवर्षी ८ टक्के वार्षिक मानधनवाढ, २०२५-२६ साठी १० टक्के वाढ. ३ व ५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस लागू. पे प्राेटेक्शन नियम अंमलात. जुन्या -नवीन कर्मचाऱ्यांतील तफावत दूर करून वेतन सुसूत्रीकरण. कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण – मृत्यू ५० लाख, अपंगत्व २५ लाख, औषधोपचार २ ते ५ लाख. ईपीएफ, ग्रॅच्युइटी योजना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू. १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांचे १०० टक्के समायोजन. समान काम समान वेतन किंवा रिक्त जागेवर अधिसंख्य पदे. सीएचओ सेवांचे नियमितीकरण सहा वर्षांनंतर. कर्मचारी मूल्यांकन अहवालावर नैसर्गिक न्यायाधिकार आदी मागण्यांना तत्वत: मान्यता मिळाली आहे. तर उर्वरित ३ मागण्या तांत्रिक कारणांमुळे नंतर सोडवण्याचे आश्वासन मिळाले आहे.