ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - सत्तेपुढे देशभक्तीने लोटांगण घातले असून पाकिस्तानचे तीन शांतिदूत भारतात शिरले आहेत, त्यांचे पायघड्या घालून स्वागत करा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधींद्र कुलकर्णी व भाजपाला लगावला आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. तीन दहशतवादी भारतात फिरत असून केंद्र सरकारने राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला या वृत्ताचा दाखल देत त्यांनी भाजपावर टोलेबाजी केली आहे. नवरात्र, दिवाळीचे निमित्त साधून दहशतवादी हल्ले होतील असा इशारा दिला जात असला तरी राज्याला याची फिकीर करण्याचे कारण नाही. देश सुरक्षित ठेवण्याची जबाबारी नव्या पाकप्रेमी शांतिदुतांनी घेतली आहे. पाकमधून येणारा प्रत्येक जण शांतीचा पैगाम घेऊन येत असल्याने या तीन शांतिदुतांसाठी पायघड्या घालून त्यांच्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा लागेल असे चिमटा ठाकरेंनी काढला आहे. या शांतिदुतांपैकी एखादा मानवी बॉम्ब असेल व तो फुटून निरपराध मरण पावला तर प्रखर राष्ट्रवाद्यांनी पाकविरोधी बोंब ठोकली महाराष्ट्रासह देशाचीही बदनामी होईल असा शेलक्या शब्दात त्यांनी सत्ताधा-यांचा समाचार घेतला. भारतात घुसलेल्या दहशतावाद्यांची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यास त्यांचे पत्त पोलिसांनी सुधींद्र कुलकर्णी आणि नेहरु सेंटर्सला कळवावे, हे दोघेही त्या दहशतवाद्यांसोबत वार्तालाप घडवून आणतील असेही त्यांनी म्हटले आहे.