- योगेश पांडे/उमेश बन्नगरे, नागपूर बनावट नोटांवर उतारा म्हणून पाचशे, हजाराच्या नोटा रद्द करून चलनात नव्या कोऱ्या दोन हजारांच्या नोटा येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानंतर लगेचच दोन हजारांची नोट कशी कसेल, याबाबत नेटवर सर्च करण्यात सीमेकडील राज्ये आघाडीवर होती. उत्तर प्रदेश, बिहारमधील गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांनीही त्यात आघाडी घेतली. हा निव्वळ योगायोग आहे की यामागे आणखी काही ‘कनेक्शन’ आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.इंटरनेटवर २०००च्या नोटेबाबत लाखो लोकांनी शोध घेतला. सर्वाधिक शोध घेणाऱ्या पहिल्या १० राज्यांत मणिपूर, झारखंड, पंजाब, हरियाणा, मेघालय, त्रिपुरा ही राज्ये होती. सर्वांत जास्त ‘सर्च’ मणिपूर राज्यातून झाले. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानमार्गे देशात नकली नोटांची तस्करी होते, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. सीमेवरील राज्यांमध्ये अनेकदा नकली नोटा जप्तदेखील झाल्या आहेत. याच ठिकाणांहून नेटवरून झालेले सर्च काळजीचा विषय नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ‘गुगल ट्रेंड’नुसार हा शोध ३ नोव्हेंबरपासूनच सुरू झाला होता. या काळात ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून दोन हजार रुपयांबाबत माहिती ‘व्हायरल’ झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे घोषणा होण्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे ६ तारखेपासून हा शोध वाढायला लागला होता. मात्र, ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करताच ‘गुगल’वर या नोटेची रूपरेषा शोधण्यास सुरुवात झाली. वादग्रस्त शहरांची ‘आॅनलाइन’ आघाडी2000 च्या नव्या नोटांचा सर्च करण्यात पहिला क्रमांक यूपीमधील फिरोझाबादचा आहे. त्यानंतर बिहारमधील समस्तीपूर, आसाममधील जोरहाट, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर, बिजनौर यांचा क्रमांक लागतो. बहुतांश शहरांत गुन्ह्यांचा दरदेखील अधिक आहे.
नव्या नोटांची उत्सुकता सीमेकडील राज्यांमध्ये
By admin | Updated: November 13, 2016 04:37 IST