जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार विनय कोरे हे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’ने आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागा, अशा सूचना मंगळवारी दिल्या. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव त्यांच्याकडून सुरू झाली. या घडामोडी पाहता सत्तारुढ गटाला अगदीच एकतर्फी वाटणारी निवडणूक अवघड बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामागे महापालिकेतील राजकारणाचे पडसाद आहेत.सद्य:स्थितीत आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ पॅनेल होणार हे निश्चित झाले आहे. त्यांना राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचाही पाठिंबा राहील. त्या बदल्यात एक-दोन जागा त्यांना दिल्या जातील. सरकारी बळ संघाच्या व निवडणुकीत आपल्या मागे राहावे यासाठी ही जोडणी आमदार महाडिक यांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी वेळोवेळी झालेल्या बैठकांतून केली आहे. एकगठ्ठा मतदार ही सत्तारूढ गटाची भक्कम बाजू आहे. त्याशिवाय आता संघाची सत्ता ताब्यात असल्याने निवडणुकीसाठी आर्थिक रसदही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांनी ठरावधारक मतदारांना सहलीवर नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचेही नियोजन सुरू आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सतेज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी महाडिक गट महापौर तृप्ती माळवी यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे लाचप्रकरणात अडकूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी आमदार मुश्रीफ यांनी महाडिक यांना जाहीरपणे तराटणी दिली. कारभाऱ्यांना आवरा नाही तर ‘गोकुळ’चे घोडामैदान लांब नाही, असे ते थेटपणे म्हणाले. त्यावर महाडिक यांनी मुश्रीफ यांना दुखावणार नाही असे जाहीर केले; परंतु ते वृत्तपत्रांतील बातमीपुरतेच मर्यादित राहिले. कारण महाडिक गटाचे ‘कारभारी’ समजले जाणारे माजी नगरसेवक सुनील कदम यांनी त्याचदिवशी रविवार असूनही आयुक्तांची भेट घेऊन महापौर यांच्यावर कारवाई करू नये व उलट ज्या नगरसेवकांनी मागणी केली त्यांच्यावरच कारवाई करण्याची लेखी मागणी केली. त्यामुळे आता शुक्रवारच्या सभेतही महापौरांचा राजीनामा होण्याची शक्यता अंधुक आहे. त्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे ‘गोकुळ’च्या राजकारणात उमटण्याची चिन्हे आहेत.सत्तारूढ पॅनेलमधून कुणाला संधी देणार हा देखील कळीचा मुद्दा आहे. मुश्रीफ यांचा कागलमधून संजयबाबा घाटगे यांचा मुलगा अंबरिश घाटगे यांच्या उमेदवारीस तीव्र विरोध आहे. याउलट घाटगे यांना वगळून पॅनेल हे पी. एन. पाटील कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळे घाटगे यांना संधी दिल्यास मुश्रीफ कागल तालुक्यापुरते संचालक रणजित पाटील यांना मदत करून सतेज पाटील यांच्या पॅनेलला ताकद देऊ शकतात. मुश्रीफ, कोरे व सतेज पाटील यांची राजकीय गट्टी झाल्यास लढत चुरशीची होणार हे स्पष्टच आहे. कारण अशा मर्यादित ठरावधारक मतदारांच्या निवडणुकीच्या राजकारणात या तिघांचीही ‘मास्टरकी’ आहे. जशी ती महाडिक यांची आहे. त्यामुळे तोडीस तोड लढत होऊ शकते. विरोधातील पॅनेल करण्यात सतेज पाटील यांनी जरी पुढाकार घेतला असला तरी पॅनेलमध्ये ते आपल्याकडे दोनच जागा ठेवणार आहेत. त्यातही स्वत:च्या कुटुंबातील अथवा नात्यातील कुणाला संधी देणार नाहीत. आता तरी विनय कोरे, मंडलिक गट, नरसिंगराव पाटील, शेकाप-जनता दल व मुख्यत: विद्यमान संचालकांच्या विरोधातील त्या-त्या तालुक्यातील प्रबळ गट यांच्या ते संपर्कात आहेत. ३२४८ पैकी २४०० मतदार आमच्याबरोबर असल्याचा सत्तारूढ गटाचा दावा आहे; परंतु वस्तुस्थिती तशी नाही. गत निवडणुकीत सत्तारूढ पॅनेल काठावर पास झाले आहे.संकट दूर होणार की...संघातील अर्ज माघारीची मुदत ८ एप्रिलला आहे. त्यामुळे सत्तारुढ व विरोधी आघाडीचेही त्याचदिवशी पॅनेल जाहीर होणार आहे. योगायोगाने त्याचदिवशी संकष्टी आहे. त्यामुळे कुणाचे संकट वाढणार आणि कुणाचे दूर होणार, याचा फैसलाही त्याचदिवशी होणार आहे.सत्तारुढ गट सगळे संचालक मिळून संघटितपणे निवडणुकीस सामोरा जात असला तरी अंतर्गत त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण जास्त आहे. पी. एन. पाटील यांना मानणारे संचालक व अरुण नरके यांचा गट यांच्यात संघातही फारसे सख्य नाही. कारण त्यांचे सगळे राजकारण एकमेकांच्या विरोधात असते. त्यामुळे एकमेकांच्या संचालकांच्या पायात पाय घालण्याचे राजकारण होणार आहे. हीच स्थिती अरुण डोंगळे यांच्याबाबतही आहे.दुसरे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे सत्तारुढ संचालकांबद्दल असलेली सुप्त नाराजी. त्याच-त्याच लोकांना आणखी किती वर्षे निवडून द्यायचे व त्यांनाच किती वर्षे सत्ता द्यायची, ही भावनाही लोकांत आहे.रवींद्र आपटे यांच्यासारखा एखादा संचालक वगळता अन्य बहुतेक संचालक स्थानिक राजकारणात सक्रिय भाग घेतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभेला त्यांनी घेतलेली भूमिका व त्यातून तयार झालेल्या नाराजीचा वचपा काढण्याची संधी या निवडणुकीत मिळते.महाडिक गटाचे वाढते वर्चस्व हे देखील जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला खुपत आहे. दोन आमदार, खासदार, साखर कारखाना, जिल्हा परिषद सदस्य आणि महापालिकेत ताराराणी आघाडीच्या हालचाली. त्याबद्दलची छुपी नाराजी ‘गोकुळ’च्या निमित्ताने एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.ही लढत भक्कम सत्तारुढ गट विरुद्ध सतेज पाटील अशी होईल, असे प्राथमिक चित्र होते. परंतु, प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया जस-जशी पुढे सरकत जाईल, तशी त्यात रंगत येणार आहे. निवडणूक अगदीच एकतर्फी होणार नाही, हे स्पष्टच दिसत आहे. त्याची तीन-चार महत्त्वाची कारणे आहेत. विश्वास पाटील, कोल्हापूर
नव्या आघाडीच्या हालचाली : सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार; महापालिका राजकारणाचे पडसाद
By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST