बीड : अवघ्या सात महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघड झाली. हे जोडपे हिंगोली जिल्ह्यातील असून ऊस तोडणीसाठी केज तालुक्यातील साळेगाव घाट येथे आले होते. हिंगोली जिल्ह्यातील गोपाळ किसन चव्हाण (२२) व प्रमिला गोपाळ चव्हाण (१९) ऊस तोडणीसाठी भैरवनाथ सहकारी साखर कारखान्यावर (सोनारी, जि.उस्मानाबाद) आले होते. पंधरा दिवसापूर्वी त्यांची टोळी केज तालुक्यातील साळेगाव घाट येथे ऊस तोडणीसाठी आली होती. तीन दिवसांपूर्वी हे जोडपे गावाला जात असल्याचे सांगून निघून गेले होते. मात्र सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे मृतदेह साळेगाव घाट येथील विहिरीत तरंगताना दिसून आले. केज उपजिल्हा रूग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठवले. (प्रतिनिधी)
नवविवाहित ऊसतोडणी दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Updated: November 18, 2014 02:07 IST