ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सोळावं धोक्याचं वरीस संपलं, असे सांगत मोदी सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली.
केंद्र आणि राज्य सरकारने आकसाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात टाकल्याचा उल्लेख छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला. यामुळे एकप्रकारे त्यांनी छगन भुजबळांना पाठिंबाच दर्शविल्याचे यावेळी दिसून आले. तर मोदी सरकारवरही त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरातबाजी केली. तसेच, दोन वर्षात देशातील शेतीचं उत्पन्न घटलं आणि रोजंदारीही घटली. त्यामुळे देशाच्या बेरोजगारीत वाढ झाली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौ-यावर सुद्धा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. देशातील मोदी लाट आता ओसरत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात, हे सर्व देशवाशियांनी लक्षात ठेवायला हवे. परदेशात गेल्यानंतर नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत. माझी परदेशात जाण्यावर टीका नाही, पण त्याठिकाणी गेल्यावर देशाची भूमिका मांडायला हवी असेही, यावेळी शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या भाषणातील काही मुद्दे -
- राष्ट्रवादीचं धोक्याचं वरीस संपलं.
- सत्तेत असतो, तर सर्वच उत्तम केलं असतं.
- दोन वर्षात भाजपनं फक्त जाहीरात केली.
- दोन वर्षात शेतीचं उत्पन्न घटलं.
- दोन वर्षात रोजंदारी घटली, बेरोजगारी वाढली.
- फक्त आसाम सोडले, तर केरऴ, बिहार, प. बंगालच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला.
- देशातील सरकार बदलले, मात्र परिस्थिती जैसे थे.
- निर्यात घटल्याने देशाचं नुकसान होतयं
- नरेंद्र मोदी भाजपाचा नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जातात हे लक्षात ठेवा.
- प्रदेशात जाऊन नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतायेत.
- देशातील मोदी लाट ओसरत चालली आहे.
- प्रदेशात जाण्याला माझा विरोध नाही, पण देशाची भूमिका मांडायला हवी.
- अनुभट्यांना अमेरिकेचा पाठिंबा मिऴाला, पण शिवसेनेचे काय करणार ?
- उद्धव ठाकरेंनी लायकी असलेल्या लोकांसोबत रहावे, नालायकांसोबत राहू नये.