ऑनलाइन टीम
पुणे, दि. १६ - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देत राष्ट्रवादीची भूमिका धनगरविरोधी नसल्याचे स्पष्ट केले. आदिवासींवर अन्याय न करता धनगरांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच पक्षाची भूमिका असल्याचे पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र धनगरांना तिस-या सूचीत नव्हे तर पहिल्या सूचीत आरक्षण द्यावे अशी मागणी असल्याचे सांगत धनगरांचा तिस-या सूचीत समावेश करण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेला विरोध दर्शवला.
दरम्यान या पत्रकार परिषदेत पवारांनी बबनराव पाचपुते यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केले. प्रत्येकाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तो पाचपुते यांनी घेतला अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली. पण पाचपुते नऊ वर्ष मंत्रीपदावर होते, हा त्यांच्यावर अन्याय आहे का? असा सवालही त्यांनी केला. पाचपुतेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.