प्रफुल्ल पटेल : तिस:या आघाडीसाठी घेणार पुढाकार!
यदु जोशी - मुंबई
काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीतून (युपीए) राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच बाहेर पडण्याची चिन्हे आहेत. बिगर काँग्रेस आणि बिगर भाजपा आघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेणार आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
देशात तिसरा सक्षम पर्याय उभा करण्याची आमचीही जबाबदारी असून सध्या त्यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे, असे सांगून खा.पटेल म्हणाले, काँग्रेस आज दुबळी झाली आहे. संपुआमध्ये अग्रणी भूमिका वठवून भाजपाप्रणित एनडीएला आव्हान देऊ शकेल, अशी या पक्षाची ताकद राहिलेली नाही. काँग्रेसला नव्याने उभारी घेण्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. तोर्पयत भाजपाची निरंकुश सत्ता आणि प्रभाव रोखण्यासाठी शक्तिशाली आघाडी आवश्यक आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधली गेली तर ते शक्य आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादीची भूमिका राहील, असे पटेल यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्रतिमेचा फटका राज्यातील आघाडी सरकारला बसला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या प्रचारात करीत आहेत. चव्हाण यांना प्रतिमेची एवढीच चिंता होती तर सत्तेला ठोकर मारून ते आधीच बाहेर का पडले नाहीत? त्यांच्या प्रतिमेचा तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कुठे फायदा झाला, असा सवाल पटेल यांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिमेचा, पंतप्रधानांच्या निष्क्रियतेचा फटका मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादीला बसतोय हे आम्हाला जाणवत होते पण त्यावेळी आम्ही ओरड केली नाही. ‘मी हजारो फायली हातावेगळ्या केल्या’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत. राज्याच्या हिताचे निर्णय त्यांनी वेळीच घेतले नाहीत याची अनेक उदाहरणो देता येतील. फक्त मंजूर फायलींच्या संख्येवर एखाद्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी सरस ठरत नाही. ते नोकरशहासारखे वागले, असेही ते म्हणाले.
अँटीइन्कमबन्सीचा फटका : निवडणूकपूर्व सव्रेक्षणात राष्ट्रवादी चवथ्या क्रमांकावर आहे, याकडे लक्ष वेधले असता पटेल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता मिळणार नाही. अँटीइन्कमबन्सीचा थोडाफार फटका आघाडी सरकारमधील दोन्ही पक्षांच्या काही प्रस्थापितांना बसेल. पण काही अनपेक्षित जागाही राष्ट्रवादीच्या पदरात पडतील. आमचे संख्याबळ वाढलेले असेल, असा दावाही त्यांनी केला.