Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे हेही या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. आरोपी खरे काय ते सांगत नसतील, तर त्यांना जनतेच्या हवाली करा, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणी न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. राजभवनावर जाऊन आम्ही राज्यपालांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सर्वपक्षीयांना बोलावले होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यपालांना भेटलो. या प्रकरणातील जे मारेकरी आहेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे, मास्टरमाइंड जो आहे, त्याच्यावरही या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर कलमे लावली पाहिजेत, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता
सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली. या घटनेला आता इतके दिवस होऊनही तपास आणि कारवाई हवी तशी गतीने होताना दिसत नाही, हेच दुर्दैव आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे, तो सापडत नाही. या प्रकरणात एसआयटी नेमली आहे, सीआयडीकडे तपास आहे. मग या सगळ्या यंत्रणा काय करत आहेत. कोणी कोणाचे मोबाइल सापडले नाही, असे म्हणतात. असेच जर सुरू राहणार असेल तर मग तुम्ही आरोपीची पोलीस कोठडी कशासाठी घेता, असा थेट सवाल खासदार बजरंग सोनावणे यांनी केला.
आरोपी खरे सांगत नसतील तर त्यांना जनतेकडे द्यावे
आरोपींची पोलीस कोठडी मिळूनही तुम्हाला काही माहिती का मिळत नाही. १५ दिवस कोठडी घेऊनही तपास पुढे जाताना दिसत नाही. तो आरोप घडला, तेव्हापासून तो आरोपी कुठे होता, याची माहिती पोलिसांनी काढली, तर दोन दिवसांत काय झाले ते समजू शकते. आरोपी पोलिसांना खरे सांगत नसले, तर मग आरोपींना जनतेकडे द्यावे. जनता त्यांच्याकडून खरी माहिती काढून घेईल, या शब्दांत बजरंग सोनावणे यांनी तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावर बोलताना, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. ती बैठक काय झाली, कशासाठी झाली, ते का भेटले, यावर मी कसे भाष्य करू, मला कसे माहिती असेल, मला त्याची माहिती नाही. ज्यावेळेस अजित पवार किंवा धनंजय मुंडे हे मला त्या बैठकीबाबत माहिती देतील, त्यानंतर मी यावर बोलतो, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.