ठाणो : बाळकुम येथील हायलॅण्ड पार्कच्या मागील बाजूस असलेल्या मैदानावरून राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये सुरू असलेला रणसंग्राम अखेर शमला असून शिवसेनेला चारीमुंडय़ा चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी हे मैदान देण्यास राष्ट्रवादीने सहमती दर्शविली आह़े भाजपानेही आपल्या नावे बुक असलेले सेंट्रल मैदान राष्ट्रवादीसाठी मोकळे करून दिले आह़े
नव्या वेळापत्रकानुसार आता पंतप्रधान मोदी यांची सभा हायलॅण्ड मैदानावर उद्या 7 वाजता तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सभा आता सेंट्रल मैदानात संध्याकाळी 6 वाजता होणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीचा या निवडणुकीत छुपा समझोता झाला आहे. जागावाटपादरम्यान काँग्रेसने केलेल्या या आरोपाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात घडलेले या भाजपा-राष्ट्रवादीतील या हायलॅण्ड मैदान नाटय़ाची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आह़े
सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कुठे घ्यायची, यावरून मागील चार ते पाच दिवस ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सुरुवातीला सेंट्रल मैदान, त्यानंतर नवी मुंबईतील पटनी मैदान, पुन्हा सेंट्रल मैदान आणि अखेर बाळकुम येथील हायलॅण्डच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मैदानावर सभा घेण्याचे निश्चित झाले. मात्र, हे मैदान तीन दिवस आधीच राष्ट्रवादीने बुक केल्याने त्यांनी ते सोडण्यास नकार दिला. परंतु, येथे 1क्क् फुटांच्या अंतरावर दोन मैदाने असल्याने पहिली सभा राष्ट्रवादीने उरकून घ्यावी आणि त्यानंतर दुस:या मैदानात मोदींची सभा होऊ शकते, असाही कयास लावला गेला होता. परंतु, व्हीआयपीच्या येणा:या गाडय़ा कुठे उभ्या करायच्या, यावरूनही मतभेद निर्माण झाले होते. अखेर, रात्री उशिरा यावर तोडगा निघाला असून राष्ट्रवादीने मोदी यांच्या सभेसाठी हे मैदान सोडणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यानुसार, रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सभा आता ठाण्यातील सेंट्रल मैदानात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता मोदींच्या सभेसाठी येथे जय्यत तयारी सुरू झाली असून केवळ मोदींसाठीच हा समझोता होता का, अशी चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीने केलेला हा समझोता भविष्याची नांदी तर नाही ना, अशीही चर्चा जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)