मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने सत्तारुढ भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात साटेलोटे झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे जावे, असा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना देण्यात यावे या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब झाल्याने दबावाचे राजकारण म्हणून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने सभापती देशमुख यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव मागे घ्यावे याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अजूनही आपल्या भूमिकेचा फेरविचार केलेला नाही. सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे निंबाळकर अथवा हेमंत टकले यांना तर उपसभापतीपद भाजपाच्या पांडुरंग फुंडकर यांना देण्याचे घाटत आहे. (विशेष प्रतिनिधी)
राष्ट्रवादी-भाजपाचे विधान परिषदेत साटेलोटे
By admin | Updated: March 10, 2015 02:01 IST