कल्याण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक मदन दराडे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री ११.४५ च्या सुमारास आधारवाडी येथील अनुभव हॉटेलसमोर घडली. मात्र, दराडे या हल्ल्यातून वाचले आहेत. बजारपेठ पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी हा गोळीबार केल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस व उपायुक्तांनी पंचनामा केला. पोलिसांनी एक पुंगळी जप्त केली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दराडे यांच्या जबानीवरून घाडगे व त्यांच्या अनोळखी चालकाविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. कोणालाही अटक केलेली नाही, असे गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले. (वार्ताहर)- मागील वर्षी दराडे यांनी घाडगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवले होते. तो राग घाडगे यांच्या मनात सलत होता. दराडे गुरुवारी रात्री अनुभव हॉटेलसमोरून मोटारीने घरी जात असताना घाडगे यांनी त्यांना ओव्हरटेक करून त्यांच्यासमोर गाडी आडवी घातली. - दराडे यांना शिवीगाळ केली, तसेच आपल्याविरोधात तक्रार दिल्याच्या रागातून रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत तेथून पलायन केले. मात्र, ती गोळी दराडे यांच्या गाडीच्या समोरील काचेस लागून डॅशबोर्डमध्ये घुसल्याने त्यांचा जीव वाचला.
निलंबित पोलिसाचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गोळीबार
By admin | Updated: July 9, 2016 02:03 IST