ठाणे : ‘लोकमत’चे ठाणे जिल्हा ब्युरो चीफ नारायण जाधव यांना पत्रकारितेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल द्वितीय राष्ट्रीय जीएनएन गौरव पुरस्काराने सोमवारी नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.नवी दिल्ली येथील कॅनॉट प्लेस भागातील मुक्तधरा आॅडिटोरियममध्ये पार पडलेल्या समारंभात पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुरेश सिंह यांच्या हस्ते जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी, मिस इंडिया शुभांगना, नवी दिल्ली विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार करणसिंह तन्वर यांच्यासह जीएनएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमपाल प्रसाद आणि इतर मान्यवर उपस्थित होते.देशभरात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे द्वितीय वर्ष होते. पाच जणांच्या निवड समितीने पुरस्काराकरिता अंतिम निवड केली असल्याचे ओमपाल प्रसाद यांनी सांगितले. निवड समितीमध्ये आयपीपीसीआयचे अध्यक्ष नरेंद्र भंडारी, दिल्ली न्यूज एजन्सीचे अध्यक्ष देवेंद्र पवार, ‘सांध्य वीर अर्जुन’चे वृत्तसंपादक विजय शर्मा, ‘श्रम’ न्यूज चॅनलचे प्रमुख विजय तोगा आणि ‘दी पॉलिटीकल अॅण्ड बिझनेस’ डेलीच्या चीफ रिपोर्टर अंजली भाटिया यांचा समावेश होता. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीतील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीएनएन पुरस्काराने नारायण जाधव सन्मानित
By admin | Updated: January 19, 2017 03:21 IST