१८ हजार प्रकरणांचा निपटारा : ६ हजार प्रलंबित जीवन रामावत - नागपूर राज्याच्या वन विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात गत वर्षभरात सर्वाधिक वनगुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात वन्यप्राण्यांच्या शिकारींसह अवैध वृक्षतोड व जंगलातील आगी यासारख्या विविध घटनांचा समावेश आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार गत एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ दरम्यान नागपूर वनवृत्तात एकूण ७,४७३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भातील ही संख्या २४ हजार २५२ वर पोहोचली आहे. वन विभागाकडे या सर्व प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे आतापर्यंत केवळ १८ हजार १७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, ६,२३५ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली आहे. वनगुन्ह्यामध्ये वृक्षतोडीची सर्वांधिक प्रकरणे आहेत. मागील सहा वर्षांत राज्यात सुमारे ९ लाख २८ हजार ८६१ झाडांची अवैध कत्तल झाली आहे. यात ४ लाख ३४ हजार सागाच्या झाडांचा समावेश आहे. अवैध वृक्षतोडीचा हा आलेख असाच चढता राहिला, तर भविष्यात ‘जंगल’ केवळ नावापुरतेच शिल्लक राहील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वृक्षतोडीमध्ये नागपूर व गडचिरोली वनवृत्त नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गतवर्षी २०१३ मध्ये गडचिरोली वनवृत्तात १६ हजार २२७ झाडांची तर नागपूर वनवृत्तात १५ हजार ९४३ झाडांची कत्तल झाली आहे. दुसरीकडे अचानक लागणाऱ्या आगीपासून जंगलाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. गत पाच वर्षांत राज्यात १९ हजार ४४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात सुमारे १ लाख ८४ हजार ९८४ हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले असून, त्यामुळे शासनाला १ कोटी ४५ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासर्व घटनांमध्ये वन विभागाने गत पाच वर्षांत विविध वनगुन्ह्यांत तब्बल ४ हजार ६०६ वाहने जप्त केली आहेत. यात ८९ ट्रक, ३० ट्रॅक्टर, १८ मेटॅडोर, १५७ जीप, कार, ट्रॅक्स व व्हॅन, ३ हजार ३७१ सायकली व ९४१ इतर वाहनांचा समावेश आहे.
वनगुन्ह्यांत नागपूर ‘अव्वल’!
By admin | Updated: July 27, 2014 01:21 IST