नागपूर : मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्यापूर्वी पळून गेलेल्या पाच खतरनाक कैद्यांपैकी दोघांना तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य एका गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना आले. शिबू उर्फ मोहम्मद शोएब सलीम खान (२४) आणि प्रेम उर्फ नेपाली शालिकराम खत्री (२४) अशी ‘जेल ब्रेक’मधील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक माऊझर, दोन कट्टे आणि दहा जीवंत काडतुसेही जप्त केली. शोएब सलीम खान, प्रेम उर्फ नेपाली शालिकराम खत्री, सत्येंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश) आणि गोलू उर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे खतरनाक कैदी ३१ मार्चच्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले होते. हे सर्व कारागृहाच्या बराक क्रमांक ६मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते. पोलीस आयुक्त शारदा यादव म्हणाले, कटाची अंमलबजावणी करण्यासाठी कैद्यांनी काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या आत चप्पलमध्ये आरी लपवून नेली. तब्बल सहा ते सात दिवस त्यांनी या आरीने खिडकीची लोखंडी गज (सळाख) कापली. ती वाकविल्यानंतर त्यातून पाचही जण उड्या मारून बराकीच्या बाहेर आले. त्यांनी छोटी भिंत ओलांडली. कारागृहातील पाच ते सहा चादरींची दोरी बनवून भिंतीवर चढून कैदी पळून गेले. (प्रतिनिधी)
नागपूर जेल ब्रेकचा छडा
By admin | Updated: May 15, 2015 01:37 IST