बाजारगाव (नागपूर) - नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये बुधवारी मध्यरात्री 12: 34 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर 16 कामगार जखमी झाले आहेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे. मयुर गणवीर ( 25) असे या घटनेत मृत झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. कंपनीच्या पी.पी - 15 प्लांटमध्ये हा स्फोट झाला आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की बाजारगावसह शिवा, सावंगा आणि नजीकच्या 10 गावांना याचे हादरे बसले. यामुळे हजारो नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडले. या स्फोटात कंपनीतील लाखो रुपयांची उपकरणे आणि साहित्य जळून खाक झाले आहे. नागपूर- अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलार एक्सप्लोजिव्हचे युनिट आहे. तेथे विविध स्फोटके, ग्रेनेड्स, ड्रोन्स इत्यादींचे उत्पादन होते. त्यातीलच पीपी- 15 या प्लांटमध्ये मध्यरात्री 12: 34 वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी रात्री 11 वाजतानंतरच्या पाळीत काम करणारे कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. या प्लांटमधील 15 ते 20 कामगार जखमी झाल्याची माहिती जखमी कामगार मंगेश देवघरे ( रा. पारडसिंगा ता. काटोल) याने दिली.
प्राप्त माहितीनुसार या घटनेतील 16 जखमी कामगारांना रात्री 1:30 ते 2 वाजताच्या सुमारास नागपूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. यातील 14 जणावर रवीनगर येथील दंदे हॅास्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय 2 कामगारांच्या हाताला दुखापत असून त्यांच्यावर राठी हॅास्पीटल, धंतोली येथे उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार स्फोट झालेल्या इमारतीच्या 200 मीटर परिसरात असलेल्या लॅबमध्ये काम करत होते. स्फोटाचे आवाज आजूबाजूच्या गावांमध्येदेखील ऐकू आले. त्यामुळे अनेक जण घराबाहेर आले. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
कोंढाळी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व आजूबाजूच्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने सोलारकडे धाव घेतली. सोबतच वरिष्ठांनादेखील याची माहिती कळविण्यात आली. रात्री 1: 45 वाजताच्या सुमारास नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी दाखल होत उपस्थित अधिकऱ्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील घटनास्थळी दाखल झाले. यांनतर वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने जखमींना नागपुरकडे रवाना करण्यात आले. याशिवाय नागपुरातून वैद्यकीय पथकदेखील बाजारगाव येथे दाखल झाले.
हा स्फोट इतका जबरदस्त होता की, थेट नागपूर - अमरावती महामार्गापर्यंत सिमेंटच्या काही विटा व मलबा येऊन पडला. याशिवाय बाजारगाव येथील काही घरांच्या भिंतीना तडे गेले. तसेच आजूबाजूच्या गावांतील घरे हादरली. काही घरांच्या खिडकीच्या काचा तडकल्या व दरवाजाच्या कुंड्यादेखील तुटल्या. या घटनेत स्टार की पॉइंट जवळील अनंततारा हॉटेलच्या दोन्ही माळ्यावरील काचा फूटल्या.
दरम्यान रात्री दीड वाजताच्या सुमारास सोलारसमोर आजुबाजुच्या गावातील लोकांची गर्दी झाली होती. अनेक जण संतप्तदेखील झाले होते. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची धावपळ झाली. घटनास्थळी तातडीने दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले.