संदीप आडनाईक/पणजी : फॅन्ड्री या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराट हा चित्रपट दिग्दर्शित करत असून मुंबईच्या एस्सेल व्हिजन या निर्मिती आणि वितरण कंपनीमार्फत त्याची निर्मिती केली जाणार आहे.गोव्यात सुरु असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस्सेल व्हिजन कंपनीचे मराठी चित्रपट विभागाचे प्रमुख निखिल साने यांनी ही माहिती दिली.सैराट ही एक प्रेमकथा असून त्याची केंद्रबिंदू एक समर्पित तरुणी आहे. या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण झाले असून पुढील वर्षापासून चित्रिकरणास प्रारंभ होईल, असे साने म्हणाले. नागराज मंजुळे यांच्या २0१३ मधील फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. या चित्रपटाने मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्युरी ग्रॅन्ड पारितोषिक मिळविले होते. नवलाखा आर्टसचे निलेश नवलाखा आणि होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. एस्सेल व्हिजन या कंपनीने परेश मोकाशी यांचा एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरामा विभागाचा उद्घाटनाचा चित्रपट होता. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो हा समृध्दी पोरे यांचा चित्रपट या कंपनीची निर्मिती आहे. येत्या जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या ओम राउत दिग्दर्शित लोकमान्य : एक युगपुरुष हा चित्रपट आणि अरुण अविनाश यांचा किल्ला : द फोर्ट हा माहितीपट प्रदर्शित होत आहेत.
फॅन्ड्रीनंतर येतोय नागराज मंजुळेचा सैराट
By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST