मुंबई : मुंबईत स्वाइनची साथ पसरली असताना जे.जे. रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला स्वाइनची लागण झाली आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नायर रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला स्वाइनची लागण झाली होती. टीबी, स्वाइनसारख्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून रुग्णालयात एन ९५ मास्कचा वापर केला जातो. पण, राज्यातील १४पैकी १२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एन ९५ मास्कची कमतरता आहे.रुग्णालयांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. मात्र, राज्यात परिस्थिती उलट आहे. सतत रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या डॉक्टर, निवासी डॉक्टर आणि परिचारिकांना वापरण्यासाठी पुरेशा प्रमाणात एन ९५ मास्क उपलब्ध नाहीत. यासंदर्भात मार्ड संघटनेने आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील निवासी डॉक्टर संसर्गजन्य आजार झालेल्या रुग्णांना रोजच्यारोज तपासत असतात. पण, त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एन ९५ मास्कचा उपयोग होतो. हे मास्क उपलब्ध असल्यास ८० टक्के संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. पण, राज्यातील १२ वैद्यकीय महाविद्यालयांत एन ९५ मास्कची कमतरता आहे. तरी, या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. एन ९५ मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मार्डने पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
राज्यात एन ९५ मास्कची कमतरता
By admin | Updated: August 22, 2015 01:09 IST