नागपूर : मुस्लीम आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, या मागणीसाठी बुधवारी विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केला.सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. पण त्यानंतर कामकाज संपेपर्यंत या विषयावर त्यांचे निवेदन झाले नाही.दुपारच्या सत्रात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनी यावर निवेदन करावे, अशी मागणी केली. यासंदर्भात पुढचे पाऊल उचलताना काही कायदेशीर बाबी तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी महाधिवक्त्यांकडे मार्गदर्शन मागण्यात आले असून, ते अद्याप मिळाले नाही. ते मिळाल्यावर निवेदन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निश्चित वेळ निर्धारित करून द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. उपसभापती वसंत डावखरे यांनी यासाठी दीड तासाचा वेळ निश्चित करून दिला. दीड तासानंतर मुंडे यांनी पुन्हा या मुद्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री सभागृहात नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकार विरोधात घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)
मुस्लीम आरक्षणावरून विधान परिषदेत गदारोळ
By admin | Updated: December 24, 2014 23:47 IST