लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : जमिनीच्या वादातून सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातील कल्हे येथे घडला. तालुका पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्हे गावाच्या पडक्या घराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला होता. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन जे. जे. रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविला होता. याचदरम्यान एकाने विरार पोलीस ठाण्यात जाऊन खून झाल्याची माहिती दिली. मात्र, खून झालेली व्यक्ती पेण तालुक्यातील जिते येथील राहणारी असल्याने विरार पोलिसांनी रायगड पोलिसांना कळविले. मात्र, या व्यक्तीची हत्या पनवेल तालुक्यातील कल्हे येथे झाली असल्याने रायगड पोलिसांनी याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि मालोजी शिंदे यांना दिली. त्याचवेळी तालुका पोलिसांना हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटली. राम गोसावी-म्हात्रे (४६) असे त्याचे नाव असून, तो पेण तालुक्यातील जिते गावाचा रहिवासी आहे. राम गोसावी-म्हात्रे याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रकार शनिवारी १७ जून रोजी दुपारी घडला होता. त्यानंतर २० जून रोजी कर्नाळा अभयारण्यात हा मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अवघ्या २४ तासांतच पनवेल तालुका पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा करून आरोपींना गजाआड केले. राम गोसावीची हत्या करणारा त्याचा सख्खा लहान भाऊ पुंडलिक गोसावी-म्हात्रे (४४) व त्याचा मित्र संदीप अजब नारायण मिश्रा (२१) हे आहेत. दोन्ही आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सख्ख्या भावाचीच केली हत्या
By admin | Updated: June 23, 2017 02:44 IST