ठाणे : तीन पेट्रोलपंप परिसरात संजय रोकडे याचा खून झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांतच यातील सर्व मारेकऱ्यांना नौपाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. मनीष आणि मंगेश जाधव यांनी आपल्या मामाच्या खुनाचा बदला घेतल्याची कबुली दिली. याबाबतचे वृत्त २४ जुलै २०१४च्या ‘लोकमत’मध्ये ‘शिवसैनिकाच्या मारेकऱ्यांचा पोलिसांना चकवा’ ‘बदला घेतल्यानंतरच चपला घालण्याचा पण’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. संजय आणि त्याचा साथीदार अनिल भोईर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संजयचा यात मृत्यू झाला होता, तर अनिल गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर मनीष आणि मंगेश जाधव यांच्यासह पाचही मारेकरी पसार झाले होते. या खुनानंतर आधी मनीष जाधव आणि मनोज सोनवणे या दोघांना अटक केली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री मनीष जाधव (३५), नीलेश पगारे (३६) आणि गणेश देवाडीया (३६) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम.बी. थोरवे यांनी दिली. त्यांना ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे़प्रादेशिक मनोरुग्णालयात अटेंडन्ट असलेल्या रोकडेवर मंगेश आणि मनीष जाधव यांचा मामा अरुण गांगुर्डे याच्या खुनाचाही आरोप होता. यात त्याला अटकही झाली होती. त्याशिवाय, दोन वर्षांपूर्वी मनीष याच्यावर रोकडेने खुनी हल्ला केला होता. यात मनीषला तब्बल ३७५ टाके पडले होते. त्यामुळे मामाचा खून आणि झालेला खुनी हल्ला या दोन्ही हल्ल्यांचा बदला मनीषला घ्यायचा होता. त्यातूनच रोकडेचा खून केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. (प्रतिनिधी)
मामाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केली हत्या
By admin | Updated: August 2, 2014 03:01 IST