आरोपी शरण : पैशावरून झाला वाद; पोलिसात केली होती तक्रारआलापल्ली (गडचिरोली) : येथील शहीद जवान अजय मास्टे चौकात शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान दोन कंत्राटदारांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याची जागीच हत्या केली. सविस्तर वृत्तानुसार, गोविंद प्रभाकर गीते (५२) रा. बीड हे मागील १५ वर्षांपासून आलापल्ली येथे वास्तव्याला होते. ते परवानाधारक कंत्राटदार आहेत. त्यांच्या परवान्यावर सुनील ऊर्फ राजू मनोहर पांढरे (३४) रा. चंद्रपूर हा कंत्राट घेऊन कमिशनवर काम करीत होता. परंतु मागील दीड-दोन वर्षांपासून या दोघांमध्ये पैशावरून वाद सुरू होता. गोविंद गिते यांना सुनील पांढरे याचे अंदाजे १० लाख रूपये देणे होते, असा आरोप सुनीलने एक वर्षापूर्वी आलापल्ली येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे केला होता. तसेच पोलिसांकडेही या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. आपण अनेक कामे लोकांकडून कर्ज घेऊन करीत होतो. त्यामुळे आपण पूर्णत: बुडालो व आर्थिक अडचणीत आलो होतो, असे तो अनेकांना सांगत होता. दरम्यान, शनिवारी १२.३० वाजता गोविंद गीते व सुनील पांढरे हे अजय मास्टे चौकात एकमेकांसमोर आले. दोघांमध्ये बाचाबाची झाली. सुनील पांढरेने गितेला जखमी करून जागीच ठार केले. आर्थिक अडचणीमुळे मी हताश झालो होतो. माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता, असे सुनीलने सांगितले. घटनेनंतर आरोपी सुनील स्वत: अहेरी पोलीस ठाण्यात गेला व त्याने अटक करवून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अहेरीचे पोलीस निरीक्षक सुभाष धावडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
कंत्राटदाराची हत्या
By admin | Updated: August 17, 2014 00:45 IST