अहमदनगर : शिवसेनेचे मुखेड (जि. नांदेड) तालुकाप्रमुख शंकर माधवराव ठाणेकर यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना गजाआड केले आहे. राहुरी (जि. नगर) शिवारात मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. दरोडेखोरांच्या या टोळीने ठाणेकर यांची हत्या केल्याचे, तसेच रस्ता लुटीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. चौघांची टोळी गजाआड झाल्याने आणखी काही दरोडेखोर हाती लागण्याची शक्यता पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी व्यक्त केली. सुपा दरोड्यातील एका आरोपीलाही गुन्हे शाखेने अटक केली.शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांची ३ सप्टेंबरला जामखेड तालुक्यात मोहगाव शिवारात दरोडेखोरांनी हत्या केली होती. त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिनेही लुटले होते. दरोडेखोेरांनी चोरून आणलेली इनोव्हा गाडी कर्जत शिवारात सोडून दिली होती. त्यानंतर तब्बल २० दिवसांनी गुन्ह्याचा तपास लागला.प्रशांत कोळी (२८, रा. निगडी, पुणे), बबन उर्फ अतुल भाऊसाहेब धावटे (२५, रा. श्रीगोंदा), किरण गोटिया हरिभाऊ सोनवणे (१९, रा. पारनेर), संदीप उर्फ अण्णा अर्जुन धावडे (२१, रा. श्रीगोंदा), उमेश भानुदास नागरे (२५, रा. राहाता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ठाणेकर हत्या प्रकरणातील चार व सुपा दरोड्याप्रकरणी प्रशांत कोळी याला अटक केली आहे.ठाणेकर यांची हत्या चौघांनीच केली असून चोरीच्या उद्देशानेच ती झाली. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांची चोरी करून गुन्हे करायचे आणि वाहने रस्त्यात सोडून द्यायचे. प्रत्येक गुन्ह्यासाठी नवे वाहन चोरायचे, असे उद्योग या टोळीमार्फत सुरू होते. आरोपींनी सुपा, बेलवंडी, श्रीगोंदा आणि जामखेड परिसरात जबरी चोरी, दरोडे केल्याची कबुली दिली आहे. अवघ्या ३६ तासांमध्ये पाच गुन्हे या टोळीने केले आहेत.
सेना पदाधिका-याच्या हत्येचा उलगडा
By admin | Updated: September 25, 2014 04:38 IST