ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी विशेष काहीही तरतुदी न करता मुंबईला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याची टीका शिवेसेनेने केली आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला वहिला मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केला. मात्र शिवसेना या अर्थसंकल्पाबाबत खुश नसून अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सेना आमदार सुनील शिंदे यांचे म्हणणे आहे. मुंबई ही शिवसेनेची असल्यानेच बजेटमध्ये अन्याय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आजच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही खास घोषणा करण्यात आल्या नाहीत. मिल कामगारांच्या घरांची तरतूद, बीडीडी चाळ, कोस्टल रोड प्रकल्प याबद्दल कोणतीही तरतूद केली नसल्याचे सांगत शिंदे यांनी आपली नाराजी नोंदवली.
भाजपाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनेने गैरसमज करून घेऊ नये, मुंबईवर काहीही अन्याय केलेला नाही असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईत भाजपाचे १५ तर सेनेचे १४ आमदार त्यामुळे मुंबई फक्त सेनेची नाही, असे सांगत शिवसेनेने अज्ञानापोटी विरोध केला असावा असे आक्रमक झालेल्या शेलार यांनी म्हटले. मेट्रो-३ साठी १०९ कोटींची तरतूद, फ्री वायफाय तसेच अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विकासातच राज्याचा विकास असून मुंबईला वेगळं मानत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.