डॉक्टरांच्या संपाचा फटका : बाळ जन्मताच पोरके, मुकुटबन येथील घटनासंजय आकीनवार - मुकुटबन (यवतमाळ) बाळाला जन्म दिल्यानंतर प्रसूतिपश्चात एका विवाहितेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपामुळे प्रसूति पश्चात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. ही घटना झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. वर्षा प्रवीण दुंप्पलवार (२५) रा़वडसा जि़नांदेड या असे मृत महिलेचे नाव आहे. मुकुटबन येथील गजानन मंदावार यांची कन्या वर्षाचा चार वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील वडसा (माहूर) येथील प्रवीण दुंप्पलवार यांच्याशी विवाह झाला होता. दुसऱ्या प्रसूतीसाठी ती माहेरी मुकुटबन येथे आली होती. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागल्यामुळे माहेरच्या कुटुंबियांनी तिला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी २ जुलैला दाखल केले. तेथेच बुधवारी दुपारी २ ते २़३० वाजताच्या सुमरास तिची प्रसूती होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला़ राज्यात मॅग्मो संघटनेतील (राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना) डॉक्टरांचा संप सुरू आहे. त्यामुळे तिची प्रसूती आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या प्रसविकांनी केली़ बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ न पडल्यामुळे वर्षाला प्रचंड रक्तस्त्राव झाला. प्रसविकांना तो थांबविणे अशक्य झाले. त्यामुळे तिचे कुटुंबिय घाबरले़ प्रसविकांचीही मोठी धांदल उडाली़ मात्र डॉक्टर नसल्याने त्या काहीही करू शकत नव्हत्या. त्यांनी लगेच पुढील उपचारासाठी वर्षाला वणी येथे नेण्याचा सल्ला दिला. लगेच वर्षाला वणी येथे नेण्यात आले. मात्र तेथेही तिने उपचाराला दाद दिली नाही. अखेर तिला चंद्रपूर येथील शासकीय रूग्णालय हलविण्यात आले. मात्र तेथे उपचारा दरम्यान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपामुळे आणि प्रसविकांच्या चुकीच्या पध्दतीमुळे तिचा जीव गेला, असा आरोप होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी आहे. तेही संपावर आहे. दरम्यान गुरुवारी वर्षांच्या मृतदेहावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
योग्य उपचाराअभावी मातेचा मृत्यू
By admin | Updated: July 4, 2014 01:04 IST