मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी हिने गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. आईच्या निधनाचे वृत्त ऐकून मी कोसळले, असे तिचे म्हणणे आहे.भायखळा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेली इंद्राणी गेल्या शुक्रवारी बेशुद्ध झाली होती. डॉक्टरांनी दिलेल्या मानसिक तणाव कमी करण्याच्या गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्याचा प्राथमिक अंदाज होता. याशिवाय इतरही तर्कवितर्क सुरू होते. याअनुषंगाने इंद्राणीसोबत असलेल्या कैद्यांपासून ते देखरेखीसाठी ठेवलेल्या कर्मचारी, डॉक्टरांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात झाली. मंगळवारी जे. जे. रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर सायंकाळी तिला कारागृहात आणण्यात आले. त्यानंतर तीन तास बसून इंद्राणीचा जबाब नोंदविण्यात आला. इंद्राणीच्या सुरक्षेत वाढइंद्राणीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात येणार आहे. ५ ते ६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. १ ते २ कॅमेरे वाढविण्यात येणार आहेत. शिवाय कोठडीबाहेर तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून कोठडीतील आरोपींची संख्या कमी करणार असल्याची माहिती कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक बिपिनकुमार सिंह यांनी दिली.सीबीआय तीनही आरोपींची चौकशी करणारइंद्राणीसह तिचा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम रायची कारागृहातच चौकशी करण्यास महानगर दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला परवानगी दिली आहे.या तीनही आरोपींची किमान तीन आठवडे कारागृहातच चौकशी करता यावी, यासाठी सीबीआयने दंडाधिकाऱ्यांपुढे अर्ज केला होता. दंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला चौकशीसाठी केवळ १२ दिवसांचीच परवानगी दिली. १९ आॅक्टोबरला या तिघांचीही न्यायालयीन कोठडी संपत आहे. न्यायालयीन कोठडी संपल्यावर या तिघांनाही सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागेल.उद्यापर्यंत अहवाल : इंद्राणीने दिलेल्या जबाबाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तिच्यासह इतर संबधितांचे नोंदविलेले जबाब, रुग्णालयाकडून प्राप्त झालेला अहवाल याची तपासणी करून शुक्रवारपर्यंत याचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.आईच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर माझी शुद्ध हरपल्याचे तिचे म्हणणे आहे. मी १३ वर्षांची असतानाही अशा प्रकारे बेशुद्ध पडले होते. मी आत्महत्या करणार नसल्याचेही तिने जबाबात म्हटले आहे.
मातृशोकाने इंद्राणी कोसळली
By admin | Updated: October 8, 2015 03:36 IST