मुंबई : मागील सरकारमधील मुख्यमंत्री, मंत्री व राज्यमंत्री यांच्या आस्थापनेवर काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या आस्थापनेवर नेमू नये, असा आदेश काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातच मागील सरकारमधील मुख्यमंत्री तसेच काही मंत्र्यांकडे काम केलेले ७८ टक्के अधिकारी व कर्मचारीवर्ग कार्यरत असल्याची बाब माहिती कायद्यान्वये उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला विरोध करणाऱ्या काही ज्येष्ठ मंत्र्यांना या नव्या आकडेवारीमुळे आपले ‘लाडके’ अधिकारी आपल्याच कार्यालयात राखण्याकरिता बळ प्राप्त होणार आहे.माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील कार्यरत कर्मचारी वर्गाबाबत विचारलेल्या माहितीला उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव दि. वा. नाईक यांनी विद्यमान व माजी मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी वर्गाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने अलीकडेच चार अधिकाऱ्यांची मूळ विभागात बदली केल्याने मुख्यमंत्री कार्यालयात मागील सरकारमध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची संख्या ७९ झाली आहे, असे गलगली यांनी निदर्शनास आणले.मुख्यमंत्री आस्थापनेवरील चार उपसचिवांपैकी दोन उपसचिव माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व रणजीत कांबळे यांच्या कार्यालयात कार्यरत होते. पाच अवर सचिवांपैकी तीन पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात आणि एक माजी मंत्री फौजिया खान यांच्या कार्यालयात कार्यरत होते. कक्ष अधिकाऱ्यांची संख्या नऊ असून, त्यांपैकी केवळ एक नवीन असून सहा पूर्वीपासून मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहेत. दोन कक्ष अधिकारी माजी मंत्री राजेश टोपे व जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयात कार्यरत होते. याखेरीज १३पैकी ८ लघुलेखक, २८पैकी २४ लिपिक-टंकलेखक, २३पैकी २१ शिपाई हे मागील मुख्यमंत्री कार्यालयातील आहेत. याखेरीज मुख्यमंत्री कार्यालयात ११ बाहेरील व्यक्तींना प्रथमच महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले असल्याकडे सामान्य प्रशासन विभागाने लक्ष वेधले आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्री कार्यालयात बहुतांश अधिकारी जुनेच
By admin | Updated: March 11, 2015 01:48 IST