पुुणे : अवघ्या १० दिवसांत जून व जुलैची सरासरी ओलांडून गायब झालेला मॉन्सून १ आॅगस्टपासून जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाला. पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला त्यामुळे दिलासा मिळाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत बारामती, इंदापूर व पुरंदर हे तालुके वगळता सर्वत्र पाऊस झाला. एकूण २१४.७० व सरासरी १६.५२ मिलिमीटर पाऊस झाला. दिवसभर जिल्ह्यात संततधार सुरूच होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत चांगला पाऊस झाला. धरणपट्ट्यांत पावसाने चांगली हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली. जून महिना कोरडा गेला होता; त्यामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला पावसाने जुलै महिन्यात कृपादृष्टी दाखविली. अवघ्या १० दिवसांत दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली होती. (प्रतिनिधी)गेले १५ दिवस पाऊस गायब झाला होता. त्यामुळे पुन्हा चिंता निर्माण झाली होती. उगवून आलेल्या पिकांना काही ठिकाणी ठिबकचा आधार घेत पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. पाणी नसल्याने भातलावण रखडली होती. ती आजपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा सुरू झाली आहे.
मॉन्सून पुन्हा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2016 01:28 IST