श्रीगोंदा (जि.अहमदनगर) : आघाडी शासनाने सिंचन प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. या सिंचन घोटाळ्यातील ७० हजार कोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीत गेले, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.भाजपाच्या शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी केवळ आरक्षणाचे राजकारण केले. आघाडी शासनाचे दिवस आता संपले आहेत. राज्यात वेगळा इतिहास घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी शासनाला पाच वर्षात करता आली नाहीत, एवढी कामे केंद्रातील मोदी सरकारने १०० दिवसांत केली. मात्र काँग्रेसवाल्यांनी आरोपाची ‘फडतुस’ पुस्तिका काढली. आरोप कसे करावेत याचे देखील ट्रेनिंग काँग्रेसवाल्यांना देण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.आघाडी शासनाच्या लंकेचे दहन करण्यासाठी बिभीषण महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत अन्यायकारी, भ्रष्टाचारी शासन संपुष्टात येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे श्रीगोंदा मतदारसंघातून बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्याचे संकेतही त्यांनी दिले.(प्रतिनिधी)
सिंचन घोटाळ्यातील पैसा पवारांच्या तिजोरीत
By admin | Updated: September 10, 2014 02:59 IST