मुंबई : ‘फोडा आणि राज्य करा’ हे इंग्रजांचे धोरणच भाजपा आणि नरेंद्र मोदी राबवत आहेत. मुस्लिमांची भीती दाखवून, देशातील जातिवाद कायम राखण्याचा डाव सत्ताधा-यांनी आखला आहे. भाजपाच्या या धोरणाविरुद्ध देशभरातील सर्वच राजकीय पक्ष, गटांनी एक होण्याची वेळ आल्याचे मत जनता परिवाराचे नेते शरद यादव यांनी गुरुवारी व्यक्त केले.२०१९ला जर मोदींना रोखले नाही, तर देशात संविधान आणि मतदानाचा अधिकारच शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, विरोधकांनी काढलेल्या संविधान बचाव रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते. स्वतंत्र भारताच्या कालखंडात देशावर इतके मोठे संकट आले नव्हते. आज अघोषित आणीबाणीच्या कालखंडातून देश जात असल्याचे शरद यादव म्हणाले.२०१९च्या निवडणुकीत जर नरेंद्र मोदी आणि भाजपा यशस्वी झाले, तर पुन्हा कधीच मुक्तपणे मताधिकार वापरता येणार नाही. संविधान आणि मताधिकार वाचवायचा असेल, तर सर्व राजकीय पक्षांनी गटतट, स्वार्थ बाजूला सारत मोदींना आव्हान द्यायला हवे, असे यादव म्हणाले.निवडणुकांना सामोरे जावे-मुख्यमंत्र्यांना रॅली काढायचीच असेल, तर त्यांनी आधी पदाचा राजीनामा देत निवडणुकांना सामोरे जावे, असे आव्हान यादव यांनी दिले.
‘फोडा आणि राज्य करा’ हीच मोदींची नीती - शरद यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 04:00 IST