राहुल गांधी : पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोलयोगेश पांडे/गणेश खवस - रामटेक/बुलडाणापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. परंतु केवळ डोके टेकवून काही होत नाही. बापूंचे विचार ते आत्मसात करू शकलेले नाहीत. मोदी यांची कृती गांधी विचारांशी विसंगत आहे अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. रामटेक येथील काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्या प्रचारासाठी शहरातील नेहरू मैदान येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान ते रविवारी बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर कडाडून टीका करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बनविण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांचे कार्य मात्र पटेल यांच्या विचारांच्या विरुद्धच राहिले आहे. एखादी गोष्ट बोलणे किंवा स्मारक बनविणे खूप सोपे असते, परंतु प्रत्यक्षात गांधी, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महान व्यक्तींची विचारधारा आत्मसात करून त्यावर चालणे फार कठीण असते. काँग्रेस पक्ष हा विचारधारेला नमन करतो व त्याच मार्गावर चालतो. काँग्रेस व आमच्या विरोधकांमध्ये नेमका हाच फरक आहे असे राहुल गांधी म्हणाले.कुठलाही देश, राज्य किंवा प्रदेश हा सरकार नव्हे तर जनता बनवते. त्यामुळे जनतेच्या विकासाला जास्त महत्त्व द्यायला हवे. परंतु वर्तमान सरकारवर ठराविक उद्योगपतींचाच प्रभाव दिसून येतो. मूठभर उद्योगपतींसाठी नव्हे तर जनतेचा भारत घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात तेथील काही नामवंत उद्योगपतींशी चर्चा केली आणि काही दिवसांतच देशात अनेक औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ कशी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसने गरीब जनतेसाठी राबविलेल्या मनरेगासारख्या योजनांचा बट्ट्याबोळ करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे असा आरोपदेखील त्यांनी केला. रामटेक येथील प्रचारसभेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक,राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, राष्ट्रीय सचिव बाला बच्चन हे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी आभार मानले.पाकसंदर्भात मवाळ धोरण का?राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भातदेखील नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सत्ता आली तर चीन व पाकिस्तान भारताला घाबरतील अशी पावले उचलू असे आश्वासन जनतेला दिले होते. परंतु चीनच्या राष्ट्रपतींसोबत ते झोके घेत असताना चीनच्या जवानांनी देशात घुसखोरी केली होती. यावर चीनला जाब विचारण्यात का आला नाही. आतादेखील पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर गोळीबार करण्यात येत आहे. आता का सरकारने मवाळ भूमिका घेतली आहे. मुळात बोलणे सोपे असते, काम करणे अवघड असते असा टोला राहुल गांधी यांनी हाणला. १०० दिवसांत काळा पैसा परत आणू म्हणणाऱ्या भाजपने आतापर्यंत एक दमडीदेखील आणलेली नाही असेदेखील ते म्हणाले.रामटेकला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करूराहुल गांधी यांनी रामटेक येथील निसर्गसौंदर्य व या परिसराला लाभलेल्या ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. राजस्थानसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक येतात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या रामटेक येथेदेखील असेच चित्र निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यावर आमचा भर असेल. केवळ महाराष्ट्र किंवा भारत नाही तर जागतिक स्तरावर रामटेकची पर्यटनासंदर्भात वेगळी ओळख निर्माण होईल. शिवाय रामटेक येथे उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करू. यामुळे तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ता आल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळेल, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा होईल तसेच जीवनदायी योजना आणखी प्रभावी करून गरीब जनतेला त्याचा जास्त लाभ देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मोदींची कृती गांधी विचारांशी विसंगत
By admin | Updated: October 13, 2014 01:27 IST