भाजपा लागली कामाला : मंडळस्तरावर आजपासून बैठकानागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. कस्तूरचंद पार्कवर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात मोदी अप्रत्यक्षपणे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद करतील. त्यावेळी समोर एक लाखाहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहावेत, असे नियोजन केले जात आहे. यासाठी मंडळस्तरावर मंगळवारपासून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळातच मोदी नागपूरमध्ये येतील, अशी शक्यता होती. मात्र त्यांचा अधिकृत कार्यक्रम ते पंतप्रधान झाल्यानंतर मिळाल्याने शहर भाजपामध्ये उत्साह आहे. मोदींच्या नागपूर दौऱ्याबाबत शासकीय पातळीवरून अद्याप काहीच सांगितले जात नसले तरी, भाजपाने मात्र यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. २१ तारखेला मोदी प्रथम मौदा येथील एनटीपीसीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. तेथेही हजारोंच्या संख्येने गर्दी व्हावी, यासाठी पक्षपातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. तेथून ते वर्धा येथील महामार्गाच्या भूमिपूजनासाठी जाणार आहेत. तेथून नागपूरला आल्यावर राजभवनमध्ये काही काळ ते विश्रांती घेतील व त्यानंतर ते कस्तूरचंद पार्क येथे मेट्रो रेल्वेसह केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत बांधण्यात येणाऱ्या २३०० कोटींच्या विविध कामांचे भूमिपूजन करतील, असा सध्याचा मोदींचा दौरा आहे.मोदी यांच्या दौऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र भाजपातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.मोदी यांचा ते पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रथमच दौरा आहे. त्यांच्याविषयी जनतेत आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे कस्तूरंचद पार्कवरील कार्यक्रम शासकीय असला तरी तेथील मैदान नागरिकांनी खचाखच भरावे, असे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सोमवारी गणेशपेठ येथील पक्षाच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. तीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. मंगळवारपासून मंडळस्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचीही यासंदर्भात बैठक झाली. त्यातही कार्यकर्त्यांना मोदींच्या दौऱ्याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेशपेठमधील बैठकीला आमदार व महापौर अनिल सोले, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, कल्पना पांडे, प्रीती अजमेरा, अर्चना डेहनकर, चंदन गोस्वामी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
मोदी करणार शंखनाद - कार्यकर्ते एक लाख
By admin | Updated: August 12, 2014 01:05 IST