ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सूटला चार कोटी रुपये मिळत असतील तर मोदींनी त्यांच्या कपड्यांचा दररोज लिलाव करावा. या लिलावातून काळा पैसा बाहेर पडू शकेल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूटवरुन उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखात उपरोधिक भाष्य केले आहे. महात्मा गांधींनी गरीबांच्या अंगावर पुरेशी वस्त्र नाहीत हे ब्रिटिशांना दाखवण्यासाठी साधा पंचा नेसला. त्या देशाचा पंतप्रधान ऐवढा महागडा सूट घालतो यावर नाहक टीका झाली असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मोदींनी एकदाच घातलेल्या सूटला ऐवढे पैसे मिळत असतील तर त्यांनी दररोज नवनवे कपडे घालून त्याचा लिलाव करावा असा टोलाही त्यांनी लगावला.
सूटवरुन टीका करणा-या विरोधकांनाही उद्धव ठाकरेंनी धारेवर धरले आहे. राहुल गांधींनी त्यांचे कपडे, चपला, कंगवा, लालूप्रसाद यादव यांनी त्यांची पिकदाणी, मुलायमसिंह यादव यांनी त्यांची धोतर, अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे मफलर विकायला काढावे, त्याला किती मोल मिळेल हे त्यांनी बघून घ्यावे असे त्यांनी सुनावले.