ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान नव्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या आज झालेल्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना, भाजपा, विहिंपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्या.
शिवसेना नेते मंचावर भाषण देण्यासाठी येताच शिवसैनिकांकडून जय श्रीराम आणि बाळासाहेब ठाकरेंचा जयघोष करण्यात आला. तर विद्या ठाकूर मंचावर येताच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जय मोदी अशी घोषणा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रामापेक्षा मोदी मोठे नाहीत, अशी टिप्पणी केली. तसेच, भाजपा कार्यकर्ते बोलू देत नसल्याचं सांगत रावते माईक सोडून निघून गेले.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून राममंदिर हे नवे स्टेशन सुरु करण्यात आले. या स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, विद्या ठाकूर आदी नेते उपस्थित होते.
दरम्यान, राम मंदिर स्थानक हार्बरवासीयांबरोबरच पश्चिम रेल्वे प्रवाशांनाही उपलब्ध होणार आहे. अजूनही गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार न झाल्याने हे स्थानक प्रथम पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल. या स्थानकवर धिम्या लोकल थांबतील. या नव्या रेल्वे स्थानकाचा जोगेश्वरी ते गोरेगावमध्ये राहणा-या रेल्वे प्रवाशांना मोठ्या फायदा होणार आहे.