भावी मुख्यमंत्र्यांचा ‘गेटअप’ तयार : शपथविधीला नागपूर फॅशनचा ‘टच’नागपूर : राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविणे ही सन्मानाची बाब. मुख्यमंत्रिपदाची शपथ नागपुरातील एखादा नेता घेत असेल तर नागपूरकरांना त्याचा गौरव वाटणेही स्वाभाविकच आहे. अर्थातच नागपूरचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नव्या वस्त्रात असावा, अशी मित्रमंडळींची इच्छा स्वाभाविक आहे. नागपूरचे लोकप्रिय नेतृत्व आ. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुरू आहे. त्यांच्यासाठी नागपुरात सीताबर्डी येथील मोदी नंबर १ मध्ये नवीन कपडे शिवून तयार झाले आहेत. फडणवीस यांची आवड लक्षात घेता त्यांच्यासाठी निरनिराळ्या रंगांचे ५ ‘मोदी स्टाईल’ जॅकेट तसेच बंद गळ्याचा कोट शिवण्यात आला आहे. शपथविधीच्या प्रसंगी फडणवीस नेमक्या कुठल्या ‘लुक’मध्ये दिसतात यासंदर्भात त्यांच्या मित्रमंडळींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते गेल्या काही वर्षांपासून सीताबर्डी येथील गोविंद कलेक्शन अॅन्ड टेलरिंग सेंटरमधून कपडे शिवून घेतात. अरुण ऊर्फ पिंटू मेहाडिया नवे कपडे शिवण्यात सातत्याने दर्जा राखत असल्याने त्यांच्याकडूनच काही नेतेमंडळी कपडे शिवतात. पिंटू यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या २० वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस निवडून आल्यानंतर खूप आनंद झाला आणि आता त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुरू आहे, यामुळे तर आनंदाला उधाण आले आहे. ते मुख्यमंत्री झाले तर शपथ घेताना नवीन वस्त्रात ते असावेत म्हणून त्यांना सहज फोन केला असता त्यांनी कपडे शिवण्याचा आॅर्डर दिला. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्र्यांचे कपडे शिवण्यासाठी पिंटू यांनी आपले टेलरिंगचे कौशल्य पणाला लावले. यावेळी पिंटू मेहाडिया म्हणाले, देवेंद्र आणि माझी जुनी मैत्री आहे. गेली १५ ते २० वर्षे ते माझ्याकडूनच कपडे शिवून घेत आहेत. पूर्वी त्यांचे वजन खूप होते, पण आता त्यांनी व्यायामाने स्वत:चे वजन कमी केले आहे. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे माप आणि आताचे माप यात फरक पडला आहे. त्यांना कुठल्या साईजचे कपडे हवेत त्याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. याशिवाय देवेंद्र यांना कुठले रंग आवडतात, वस्त्रांचे डिझाईन्स कसे आवडते आणि त्यांना कुठल्या पद्धतीचे वस्त्र हवे असतात, याचीही माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी नव्या कपड्यांची आॅर्डर दिल्यानंतर त्यांच्यासाठी यंदा खास वस्त्रांची तयारी करण्यात आली. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना नवे वस्त्र लागणार आहेतच. निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना ते सातत्याने दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांच्यासाठी त्यांना आवडणारे कपडे मी तयार करून ठेवले होते. सातत्याने दर्जा राखण्याचा प्रयत्न मी केला त्यामुळेच काही नेते माझ्याकडे कपडे शिवून घेतात. गोविंद कलेक्शन गेल्या २५ वर्षांपासून आहे. पूर्वी मोठे भाऊ दुकान पाहायचे. महाविद्यालयात असतानापासून पिंटू मेहाडिया या प्रतिष्ठानशी जुळले. त्यावेळी कपडे शिवण्यासाठी टेलर ठेवले होते. पण मोसमांच्या काळात कारागिरांचा मनस्ताप सहन करावा लागायचा म्हणून रागारागात पिंटू यांनी कपड्यांचे कटिंग करण्याचे काम शिकले. तेव्हापासून ते स्वत:च कपडे शिवण्याचा व्यवसाय करीत आहेत.(प्रतिनिधी)फडणवीस यांचे ‘फॅशन स्टेटमेंट’गेली अनेक वर्षे पॅन्ट आणि शर्टवर फडणवीस जॅकेट घालत नव्हते, पण मागील दोन वर्षांपासून जॅकेट घालण्याला त्यांनी पसंती दिली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान फडणवीस यांनी आवर्जून आकर्षक जॅकेट्स वापरले होते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेट्सने नवीन ‘ट्रेन्ड’ निर्माण केला आहे. त्यामुळे शपथविधीदरम्यान त्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसावे यासाठी निरनिराळ्या रंगाचे पाच जॅकेट्स तयार करण्यात आले आहेत. यात राखडी, गुलाबी, केशरी, बदामी व फिक्कट हिरव्या रंगाच्या जॅकेट्सचा समावेश आहे. शिवाय राजकारणातील पारंपरिक ‘फॅशन स्टेटमेन्ट’ पाहता त्यांच्यासाठी बंद गळ्याचा कोटदेखील शिवण्यात आला आहे. साधारणत: फडणवीस बंद गळ्याचे कोट घालत नाहीत. मात्र शपथविधीदरम्यान त्यांना हा कोट कसा दिसेल यासंदर्भात त्यांच्या खास मित्रांमध्ये चर्चा सुरू आहे. शिवाय भावी मुख्यमंत्र्यांसाठी पांढरा शर्ट आणि ब्ल्यूज ग्रे रंगाचा पॅन्ट देखील शिवून तयार आहे. पिंटू मेहाडिया यांनी स्वत: त्यावर काम केले. त्यांना शपथ घेताना जो पॅन्ट-शर्ट आवडेल तो ते निवडतील, असे पिंटू म्हणाले. अतिशय निगर्वी, अभ्यासू असलेले देवेंद्र यांच्यासारखा योग्य माणूस मुख्यमंत्री होणार असल्याचा आनंद वाटतो, असेही यावेळी पिंटू मेहाडिया यांनी सांगितले.
बंद गळ्याचा कोट की ‘मोदी’ जॅकेट?
By admin | Updated: October 28, 2014 00:28 IST