मुंबई : दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला. रस्त्यांवरचे खड्डे व इर्स्टन फ्री वेवर झालेला अपघात यातून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक झाली. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या. सिग्नल, इंजिन बिघाड आणि पाणी साचल्याने तिन्ही मार्गांवरील लोकल सेवांना फटका बसला. ईस्टर्न फ्री वेवर सकाळच्या सुमारास चार वाहनांचा एक विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे वाहन घेऊन कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ईर्स्टन फ्री वेच्या देवनारकडील बाजूने तर वाहनांना प्रवेश बंदीच करण्यात आली. एक तासापेक्षा जास्त वेळ अपघातग्रस्त वाहने हटवण्यात गेल्याने परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या. घाटकोपरकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही तीच परिस्थीती होती. वाकोला, जोगेश्वरी येथील खड्ड्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे खड्ड्यांतून वाट काढत जाताना वाहने धीम्या गतीने पुढे सरकत होती. या सर्व गोंधळामुळे अर्धा तासाच्या प्रवासाला वाहन चालकांना एक ते दीड तास लागत होता. (प्रतिनिधी)>तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीतपावसामुळे मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कुर्ला येथे सकाळी आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मेन लाईनवरील चार आणि हार्बरवरील दोन अशा सहा मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्या. जवळपास पाऊण तासांनी सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीनंतर लोकल सेवा सुरळीत झाली.यातून मध्य रेल्वे सावरत असतानाच अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान रुळावर पाणी साचल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. दुपारी बाराच्या सुमारास बदलापूरजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले. त्यामुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकल सेवांवर परिणाम झाला.दुरोन्तो एक्सप्रेसला विलंब : सीएसटीहून हावडाला जाणाऱ्या दुरोन्तो एक्सप्रेसला मंगळवारी १५ मिनिटे विलंब झाला. संध्याकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी एक्सप्रेस १५ मिनिटे उशिरा सुटली. खानपान सेवेचे कंत्राट असलेली खाद्यपदार्थांची गाडी सीएसटी येथे वेळेवर पोहोचू शकली नाही.
मुसळधार पावसामुळे मंदावला मुंबईचा वेग
By admin | Updated: July 20, 2016 06:17 IST