आठवडाभरात १० कोटींच्या कामांना मंजुरी : आचारसंहितेपूर्वी धावपळ नागपूर : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी विकास कामाला सुरुवात करता यावी, यासाठी आमदार व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत बैठकांचा सपाटा लावला आहे. अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. मंजुरीसाठी धावपळ सुरू आहे. आठवडाभरात १० कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे. गेल्या दोन महिन्यात ५० कोटींहून अधिक कामे मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायतस्तरावर जनसुविधांसाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली. ग्रामस्तरावरील विकास कामांचे युद्धस्तरावर नियोजन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ५६ तीर्थक्षेत्राच्या कामांना मंजुरी मिळाली. याची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी कामाची यादी घेऊन जि.प. मुख्यालयात आले. दोन दिवसात ६ कोटींच्या ५६ कामांना मंजुरी देण्यात आली. आचारसंहिता एक-दोन दिवसात लागली नाही तर याही कामाच्या भूमिपूजनाचा बार उडविण्याची आमदारांची तयारी आहे. रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती सुधार, पीव्हीसी पाईप, शेळ्या वाटप, बैलबंडी वाटप, शाळा इमारत बांधकाम, पाणीपुरवठा योजना, सायकल वाटप अशा योजनांना गती आली आहे. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याने प्रशासन गतिमान झाले आहे. अधिकाऱ्यांच्या टेबलवर महिनोन्महिने धूळ खात पडणाऱ्या फाईल्स एका दिवसात निकाली निघत आहे. आचारसंहितेपूर्वी उद्घाटनाचा नारळ फ ोडता यावा, यासाठी काही आमदार स्वत: जि.प.मध्ये फाईल्स घेऊन फिरत आहेत. अशीच तत्परता गेल्या पाच वर्षांत दाखविली असती तर आज अशी धावपळ करण्याची गरज नव्हती, अशी जि.प.मध्ये चर्चा आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षापदाधिकारी व आमदारांच्या बैठका, फाईल्सचा निपटारा करण्यासाठी लावलेला तगादा यामुळे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. आचारसंहिता जारी होताच यातून सुटका होणार असल्याने अधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षा आहे.
मिशन फाईल्स जोरात
By admin | Updated: September 11, 2014 01:12 IST