औरंगाबाद : दुष्काळी परिस्थितीत एकीकडे राज्य शासनाकडून अजून फारसा दिलासा मिळत नसल्याचे चित्र असताना दुसरीकडे मराठवाड्यातील निम्म्याहून अधिक लोकप्रतिनिधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावून येत नसल्याची स्थिती आहे.शासकीय यंत्रणा सक्रीय करण्याच्या कामी मराठवाड्यातील बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे हे दोन कॅबिनेट मंत्री आघाडीवर आहेत. आढावा बैठकांपासून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. विभागातील आठ खासदारांपैकी अशोक चव्हाण (नांदेड), रावसाहेब दानवे (जालना), बंडू जाधव (परभणी), राजीव सातव (हिंगोली), प्रीतम मुंडे (बीड), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), सुनील गायकवाड (लातूर) हे सात खासदार सक्रीय आहेत. बैठका, दौरे आणि अधिकाऱ्यांना सूचना या पातळीवर त्यांचे काम दिसून येत आहे. उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड मात्र या परिस्थितीत सक्रीय नसल्याचे दिसते. त्यांचा मोबाईल सतत बंद राहत असल्याने शेतकरी त्यांच्या कानावर तक्रारीही घालू शकत नाही, अशी स्थिती आहे. लातूर जिल्ह्यातही त्यांच्याबाबत ओरड आहे. आमदारांमध्ये सत्तारुढ भाजपा- शिवसेनेचे अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे, संभाजी पाटील निलंगेकर, प्रशांत बंब, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, हेमंत पाटील अत्यंत सक्रीय आहेत. तर विरोधी पक्षातील राजेश टोपे, राणा जगजितसिंह, अब्दुल सत्तार, अमिता चव्हाण, अमित देशमुख, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरण्याबरोबरच बैठका आणि नियोजनात सहभाग दर्शविला आहे. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांची या पार्श्वभूमीवर एकही बैठक झाली नाही. पालकमंत्र्यांचेही दुर्लक्ष..पालकमंत्र्यांमध्ये उस्मानाबादचे डॉ. दीपक सावंत, औरंगाबादचे रामदास कदम यांचे दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले आहे. बीड आणि लातूरच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचे लातूरपेक्ष़ा बीडकडे अधिक लक्ष असल्याचे दिसते. तर नांदेडचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते नांदेडपेक्षा औरंगाबादमध्ये जादा रस दाखवित असल्याचे चित्र आहे. बैठकीलाही ते उशीरा आले होते.
मदतीसाठी मोजकेच लोकप्रतिनिधी
By admin | Updated: September 17, 2015 01:15 IST